
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींनी सोमवारी नंदिग्राममध्ये रोड शोमधून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. अधिकारी परिवाराची ‘ना घर का, ना घाट का’ हालत करून सोडणार आहे. मी रॉयल बंगाल टायगर आहे. शेर बनून चोख जबाब देणार, असा इशारा ममतादीदींनी प्रतिस्पर्धी सुवेंदू अधिकारींना दिला. तसेच अमित शहांना आधी उत्तर प्रदेशचे बघा, असा जोरदार टोला हाणला.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा झाल्यानंतर इथली राजकीय धुळवड आणखीन रंगात आली आहे. ममता बॅनर्जींनी भाजपच्या मोठमोठय़ा दाव्यांची हवा काढण्यासाठी नंदिग्राममध्येच मुक्काम ठोकला आहे. सोमवारी त्यांनी मोठय़ा रोड शोने येथील निवडणूक प्रचाराची सुरुवात केली. प्रचारसभेत बोलताना त्यांनी अधिकारी परिवार, भाजप व पेंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर जोरदार शरसंधान साधले. जर तुम्ही भाजपला निवडून दिले तर ते तुम्हाला आपल्या राज्यातून बाहेर काढतील. भाजपबाहेरच्या गुंडांच्या मदतीने बंगालच्या प्रत्येक गोष्टीवर कब्जा करायला निघालाय. इतकेच नव्हे, तर ते बंगालच्या अस्तित्वावरही कब्जा करतील, असे मतदारांना उद्देशून बोलताना ममता बॅनर्जींनी भाजपच्या मनसुब्याची पोलखोल केली. त्यांच्या आरोपांवर सुवेंदू अधिकारींनी पलटवार केला. बेगम बंगालला मिनी पाकिस्तान बनवणार असल्याची टीका त्यांनी केली.
हाथरसच्या घटनेवर अमित शहा गप्प का होते?
वृद्ध महिलेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरणारे अमित शहा यांना ममता बॅनर्जींनी सडेतोड उत्तर दिले. वृद्ध भगिनीचा कशाने मृत्यू झाला हे मला माहीत नाही. मी महिलांविरोधातील हिंसेचे अजिबात समर्थन करीत नाही. परंतु, भाजप सध्या या मुद्याचे राजकारण करीत आहे. बंगालची काय स्थिती आहे, असे ट्विट अमित शहा करताहेत. उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये महिलेवर हल्ला झाला त्यावेळी अमित शहा गप्प का होते, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे.






















































