
तृणमूल काँग्रेसच्या नेते–कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात धरणे आंदोलन करणाऱ्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज भाजपला जोरदार आवाज दिला. ‘भाजपला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय मी मरणार नाही,’ अशी घोषणाच त्यांनी केली.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून बंगालमध्ये हिंसाचार सुरू आहे. सत्ताधारी भाजपचे कार्यकर्ते तृणमूलच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करत आहेत. दोन दिवसांपूर्वी खासदार अभिषेक बॅनर्जी व कल्याण बॅनर्जी यांच्यावरही हल्ला झाला. त्यामुळे संतापलेल्या ममता मंगळवारी कार्यकर्त्यांसोबत कोलकात्यात धरणे आंदोलनाला बसल्या. इच्छित स्थळी आंदोलनाची परवानगी नाकारल्यामुळे त्यांनी बसस्टॉपवरच ठिय्या दिला. पोलीस आमच्या कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
ममतांनी यावेळी भाजपवर तुफानी हल्ला चढवला. ‘भाजपचे अध्यक्ष स्वतः अनेकदा मला मदतीसाठी फोन करायचे. त्यांच्या वाईट काळात मी त्यांना अनेकदा मदतही केली होती. हे कधी मी जाहीर बोलले नाही, असे ममतांनी सांगितले. ‘मी इथेच आहे आणि इथेच राहणार. जोपर्यंत जिवंत आहे, न घाबरता लढत राहीन. भाजपला हटवल्याशिवाय मरणारही नाही,’ असे त्यांनी ठणकावले.
बंगालमध्ये पक्षफोडीचा महाराष्ट्र पॅटर्न
तृणमूल काँग्रेसने हकालपट्टी केलेल्या दोन आमदारांनी पक्षावर दावा केला आहे. जवळपास 50 आमदार आमच्यासोबत आहेत. आमच्याकडे दोनतृतीयांश बहुमत आहे. त्यामुळे आमचा पक्षच खरा तृणमूल काँग्रेस आहे. आमच्या गटातील आमदारालाच विरोधी पक्षनेते पद दिले जावे असे त्यांचे म्हणणे आहे. लवकरच ते विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये पक्षफोडीचा महाराष्ट्र पॅटर्न राबवला जाऊ शकतो,’ असे तृणमूल काँग्रेसेचे निलंबित नेते रिजू दत्ता यांनी सांगितले.

























































