पोटदुखीचा होता त्रास; डॉक्टरांनी गुप्तांगातून काढला 59 फूटांचा जंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अपघाताने किंवा अनावधानाने पोटात काही गोष्टी जातात. पोटातून त्या आतड्यात येतात. तिथे फसतात किंवा पुढे मलमार्गात अडकतात. त्याचा अनेकांना त्रास होतो. डॉक्टरांकडे गेल्यावर तपासणीत अशा गोष्टी अडकल्याचे लक्षात येते. मात्र, थायलंडमधील एका व्यक्तीच्या गुप्तांगात तब्बल 59 फूटांचा जंत असल्याचे निष्पन्न झाले. या तपासणीमुळे डॉक्टरही चक्रावून गेले होते.

थायलंडमधील नोंगखाई प्रांतातील एका 67 वर्षांच्या व्यक्तीला पोटदुखीचा त्रास होत होता. तसेच त्याचे पोटही फुगत होते. डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी काही तपासणी करण्याचा सल्ला रुग्णाला दिला. त्या तपासण्यांमध्ये या व्यक्तींच्या गुप्तांगात 59 फूटांचा परजीवी जंत असल्याचे निष्पन्न झाले. एवढा मोठ्या आकाराचा परजीवी जंत बाहेर काढण्याचे आव्हान डॉक्टरांसमोर होते.

डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून गुप्तांगातील हा जंत मलमार्गाद्वारे बाहेर काढला आहे. शस्त्रक्रियेनंतर त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशा प्रकारचा त्रास दुर्मिळ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच एखाद्याच्या शरीरात एवढ्या मोठ्या आकाराचा जंत आढळण्याची ही पहिलीच घटना असावी, असेही डॉक्टरांनी सांगितले. हा जंत आतड्यांमधून त्या व्यक्तीच्या गुप्तांगापर्यंत पोहचला, हे देखील विचित्र असल्याचे डॉक्टर म्हणाले.

नोंगखाईतील पैरासिटिक डिजीज रिसर्च सेंटरमध्ये या व्यक्तीची तपासणी करण्यात आली. त्या तपासणीत त्याच्या गुप्तांगात 18 मीटरपेक्षा लांब परजीवी जंत असल्याचे आढळले. कच्चे मांस खाल्ल्यास ही परजीवी जंत व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. असे जंत सुमारे 30 वर्षांपेक्षा जास्त काळ व्यक्तीच्या शरीरात राहू शकतात. वैद्यक शास्त्र प्रगत झाल्याने अशा जंताचे निदान लवकर झाल्यास औषधोपचाराने ते बाहेर काढता येतात, असेही डॉक्टरांनी सांगितले.

या रुग्णाच्या गुप्तांगात असलेला जंत खूप मोठा असल्याने औषधोपचाराने तो बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे शस्त्रक्रिया करून मलमार्गाद्वारे तो बाहेर काढण्यात आला आहे. या शस्त्रक्रियेसाठी जास्त वेळ लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तपासणीत आढळल्यापेक्षा हा जंत जास्त मोठा होता. त्याची लांबी तब्बल 59 फूट एवढी होती, असे डॉक्टरांनी सांगितले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. त्याला खाण्याबाबत काही सूचना देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारचा त्रास टाळण्यासाठी कच्चे मांस खाणे टाळावे असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.