व्यावसायिकाला धमकावणाऱ्या दाऊदच्या हस्तकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईतील बडय़ा हस्ती आणि व्यावसायिकांकडून खंडणीवसुलीसाठी दाऊद टोळीने आपल्या जुन्या हस्तकांना कामाला लावले आहे. दुबईतून मुंबईत आलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाला धमकाविणाऱया रामदास रहाणे याला मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. रहाणे हा १९९७ सालापासून गुन्हेगारी क्षेत्रात असून त्याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले.

मुंबईतील व्यावसायिकाने १९९९ ते २००१ यादरम्यान दुबईत एक हॉटेल सुरू केले होते. यामध्ये त्याच्या मित्रानेही गुंतवणूक केली होती, मात्र याच कालावधीत दाऊदच्या इशाऱयावरून या व्यावसायिकाच्या मित्राची हत्या करण्यात आली. त्याने गुंतविलेली रक्कम आमच्या टोळीची असल्याचे सांगत दाऊदच्या हस्तकांनी त्यासाठी व्यावसायिकाकडे तगादा लावला. काही रक्कम त्याने दिली, पण मुंबईत परतल्यावरही त्याला ५० लाखांसाठी धमक्यांचे कॉल येऊ लागले. त्याने यासंदर्भात तक्रार केल्यानंतर खंडणीविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अजय सावंत, पोलीस निरीक्षक सचिन सावंत, सहायक निरीक्षक वंजारी, पवार, सुर्वे यांच्यासह फुटाणे, जाधव, बोरकर, पाटील, पवार, मुळे, गायकवाड यांच्या पथकाने धमकी देणाऱयाचा शोध सुरू केला.

तपासादरम्यान यामध्ये दाऊदचा जुना हस्तक रामदास रहाणे याचा हात असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्याला मालाड येथून पकडले. त्याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली. रहाणे याच्यावर सुमारे ११ गंभीर गुन्हे आहेत. मुंबईत बिल्डर ढोलकिया यांच्या कार्यालयावर तसेच चित्रपट निर्माता राजू राय याच्या गोळीबार करण्यामध्येही रहाणे याचा हात होता. रहाणे याला अनेकदा अटक झाली असून तो तुरुंगातही जाऊन आला आहे.