
सामना ऑनलाईन । मुंबई
बायकोचा मृतदेह गाडीतून घेऊन फिरणाऱ्या नवऱ्याची मुंबई पोलिसांनी कसून चौकशी करायला सुरूवात केली आहे. सुखराम पुरोहित असं या व्यक्तीचं नाव असून त्याने बायकोचा मृतदेह गाडीच्या मागच्या सीटवर ठेवून गुपचूपरित्या त्यावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा डाव उघडकीस आला. या सगळ्या प्रकाराची सुरुवात ६ जून रोजी झाली होती. पोलीस आता या घटनेचा सखोल तपास करीत आहेत.
६ जून रोजी सुखरामची बायको मणी हिचा मृत्यू झाला होता. सुखरामचा दावा असा आहे तो घराबाहेर गेला असताना तिने गळफास लावून आत्महत्या केली. घरी आल्यावर सुखरामने मणी निपचित पडल्याचं बघितलं. त्याने तातडीने त्याच्या दोन मित्रांना बोलावलं आणि गाडीच्या मागच्या सीटवर मणीला बसवलं. साडीचा पदर तिच्या चेहऱ्यावर ओढून घेतला आणि तिथून ते एका खाजगी रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी मणीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आणि त्यांनी तिचा मृतदेह सरकारी रुग्णालयात तातडीने नेण्याच्या सूचनाही केल्या. या रुग्णालयातून बाहेर पडताच सुखरामने सरकारी रुग्णालयात न जाता थेट स्मशानभुमीचा रस्ता धरला. तिथून त्याने मणीच्या नातेवाईकांना फोन केला.
मणीचे नातेवाईक धावतपळत स्मशानभुमीत पोहोचले. ते जेव्हा आले तेव्हाही मणीचा मृतदेह गाडीच्या पाठच्या सीटवर बसवून ठेवण्यात आलेला होता, आणि तेव्हाही तिच्या चेहऱ्यावर पदर ओढलेला होता. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने मणीच्या नातेवाईकांनी गाडी थेट शताब्दी रुग्णालयात नेली आणि तिथे मणीचं पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. पोलीस आता व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा करीत असून या अहवालानंतर मणीच्या मृत्यूबाबत अधिक स्पष्टता येईल. सुखरामने मणीच्या चेहऱ्यावर पदर का ओढला होता, खाजगी रुग्णालयातून स्मशानभूमीपर्यंत त्याने अँम्ब्युलन्समधून मणीचा मृतदेह का आणला नाही, आणि सुखरामने मणिचा मृतदेह मागच्या सीटवर बसवून का ठेवला होता या तीन प्रश्नांनी मणीच्या नातेवाईकांना सतावलं असून याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा पोलीसही प्रयत्न करीत आहेत.

























































