
सामना ऑनलाईन । वर्धा
आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची हत्या करून पीडितेच्या वडिलांनी सूड घेतल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यात घडली आहे. समुद्रपूर तालुक्यातल्या जाम येथील फकिरवाडीमध्ये ही हत्या झाली आहे. सलमान पठाण (25) असे मृताचे नाव असून या प्रकरणी समुद्रपूर पोलिसांनी आरोपीला पित्याला अटक केली आहे.
दोन वर्षांपूर्वी मृतक सलमान पठाण याने आरोपीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. बलात्कार प्रकरणी सलमानला न्यायालयाने शिक्षा सुनावत त्याची तुरूंगात रवानगी केली होती. एक वर्ष शिक्षा भोगल्यानंतर सलमान जामिनावर सुटला होता. मात्र आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नराधम जामिनावर आल्याने पीडितेच्या वडिलांना राग अनावर झाला. याच रागाच्या भरात त्याने सलमानची मोटारसायकल अडवून लोखंडी सळीने वार करून त्याची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली असून पुढील तपास करीत आहेत.


























































