
मिलींद देखणे । नगर
नगर मधील आरणगाव परिसरात पैशाचा वादातून मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पैसे उधार देण्यास नकार दिल्याने एका तरुणाने त्याच्या मित्राची निघृणपणे हत्या केल्याचे उघड झाले आहे. अमित खामकर असे त्या खूनी मित्राचे नाव असून त्याने राहुल निमसे याची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अमितला अटक केली आहे.
अमित खामकर याच्या बहिणीला पैशाची गरज होती. त्यामुळे पैशासाठी तिने अमितकडे मदत मागितली होती. मात्र अमितकडे पैसे नसल्याने त्याने राहुलकडे पैसे उधार देण्यासाठी तगादा लावला होता. मात्र राहुल पैसे देण्यासाठी तयार नव्हता. एका कंपनीत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या राहुलची घरची परिस्थीतीही बेताचीच होती. त्यामुळे राहुल याने देखील पैसे देण्यास टाळाटाळ केली. याचा अमितला प्रचंड राग आला होता. गुरुवारी अमितने राहुलला अरणगावाजवळ भेटायला बोलावले. त्यानंतर त्याने दमदाटी करत पैसे देण्यास सांगितले. मात्र राहुलने नकार दिल्यानंतर अमितने रागाच्या राहुलची हत्या केली. त्यानंतर त्याने त्याचा मृतदेह चादरीत गुंडाळून आरगाव केडगाव शिवाराच्या इथे फेकून दिला. त्यानंतर अमितनेच राहुलच्या घरी फोन करून राहुलची हत्या केल्याचे त्याच्या आई वडिलांना सांगितले.
राहुलच्या आई वडिलांनी याबाबत पोलिसांत कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून राहुलचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर अमितला पकडण्यासाठी अनेक ठिकाणी नाकाबंदी केली होती. त्याचेवळी अमित त्याच्या बहिणीकडे लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अमितच्या बहिणीच्या घरी धाड टाकत त्याच्या मुसक्या आवळल्या.


























































