नराधम पतीने गरोदर पत्नीला दिला ट्रेनमधून धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या दहिसर ते मीरा रोड स्थानकादरम्यान एका व्यक्तीने स्वत:च्या गरोदर पत्नीला चालत्या ट्रेनमधून ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सागर असे त्या नराधम पतीचे नाव असून राणी ही त्याची दुसरी पत्नी आहे. सुदैवाने ती महिला व तिच्या पोटातील बाळ दोघेही सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

आरोपी सागर हा त्याची पहिली पत्नी आणि दोन मुलांबरोबर बोरीवली येथील रावळपाडा येथे राहत होता. सागरचे राणीसोबत अनैतिक संबंध होते. सागरसोबतच्या संबंधातून राणी गरोदर राहिली होती. त्यांच्या या संबंधाविषयी सागरच्या पहिल्या पत्नीला समजल्यानंतर ती मुलांना घेऊन वेगळं राहायला गेली. त्यानंतर सागरने 1 नोव्हेंबरला राणी सोबत लग्न केले. लग्नाच्या वेळी राणी ही 6 महिन्यांची गर्भवती होती. पण हे मूल जन्माला येऊ नये असे सागरला वाटत होते. या कारणावरून त्या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. त्यामुळे राणी ही सागरला वैतागून माहेरी निघून गेली होती.

15 नोव्हेंबरला सागर राणीला भेटायला तिच्या माहेरी गेला. नालासोपारा येथे एका ओळखीच्या व्यक्तीला भेटायला जाऊया असे सांगून त्याने राणीला स्वत:सोबत नेले. त्यानंतर दोघेही विरार लोकल ट्रेनने नालासोपाराला जाण्यासाठी निघाले. प्रवासात ते दोघेही ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे होते. त्यावेळीही त्यांच्यामध्ये भांडणं सुरू होती, असे समजते. त्यानंतर सागरने राणीला मारहाण करायला सुरुवात केली व तिला चालत्या ट्रेन मधून खाली धक्का दिला. लोकलचा वेग कमी असल्यामुळे राणीला गंभीर दुखापत झाली नाही. रेल्वे रुळावर पडलेल्या राणीला जीआरपी आणि रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने राणी व तिच्या पोटातील बाळ दोघेही सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी सागरविरोधात खुनाचा प्रयत्न व धमकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे.