हौसेला मोल नाही… पिस्तूलासाठी त्याने केली विदेशी कुत्र्यांची विक्री

हौस पूर्ण करण्यासाठी शहरात कोण काय करेल याचा काही नेम नाही. अशीच एक हौस तरुणाच्या अंगलट आली आहे. पिस्तुल घेऊन फिरण्याच्या हौसेसाठी त्याने विदेशी “कुत्र्यांची पिल्ले” विक्री करण्याचा व्यवसाय केला. त्यातून मिळालेल्या पैशातून त्याने पिस्तुल विकत घेतले. मात्र, गुन्हे शाखेच्या युनिट एकने संबंधित तरुणाला अटक केली. कुणाल दयानंद पाटोळे (वय -19, तळजाई पठार, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळजाई पठार मित्र मंडळाच्या मंदिरासमोर एकजण उभा असून त्याच्या कंबरेला पिस्तुल असल्याची माहिती कर्मचारी अमोल पवार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कुणालला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पिस्तुल आणि काडतुस मिळून आले . चौकशीत त्याने पिस्तुल घेऊन आपण फिरावे असे वाटत असल्याने घेतल्याचे पोलिसांना सांगितले. पिस्तुल घेण्यासाठी त्याने काही दिवस विदेशी कुत्र्यांची पिल्ले विक्रीचा व्यवसाय केला होता. यातून मिळालेल्या पैश्यातून त्याने पिस्तुल घेतले असल्याचे सांगितले. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, कर्मचारी अमोल पवार, अजय थोरात, वैभव स्वामी, तुषार माळवदकर, बाबा चव्हाण, सुभाष पिंगळे यांच्या पथकाने केली

आपली प्रतिक्रिया द्या