रिल बनवण्यासाठी वसईच्या किल्ल्यात आग पेटवली, पुरातत्व खात्याला पत्ताच नाही!

सध्या सोशल मीडियाच्या प्रभावामुळे अनेकांना झटपट प्रसिद्ध होण्याची हौस निर्माण झाली आहे. एका तरुणाने इन्स्टग्रामवर रील बनवण्यासाठी वसईच्या किल्ल्यात एका सैनिकाच्या स्मृतिस्थळावर आग पेटवल्याचं वृत्त आहे. गंभीर म्हणजे या प्रकाराबाबत पुरातत्व खात्याला पत्ताच नसून त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं येत असल्याचा आरोप इतिहास संशोधक आणि अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी केला आहे.

सोशल मीडियावर वसई किल्ल्यातील एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या किल्ल्यातील एका स्मृतिस्थळावर एका तरुणाने इंग्रजी एस लिहिला असून तो त्याला आग लावत आहे. पार्श्वभूमीला बेवफा हे गाणं लावून त्याने हे रील बनवलं आहे. एकेकाळी पोर्तुगीजांची शान मानला जाणारा आणि मराठ्यांनी पराक्रमाने जिंकलेला हा वसईचा किल्ला सध्या भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहे. या किल्ल्याच्या आत पोर्तुगीजांकडून लढलेल्या सैनिकांच्या स्मृतींसाठी जमिनीवर अनेक आयताकृती स्मृतीशिळा बनवण्यात आल्या आहेत. त्यांची निर्मिती 1680 सालात करण्यात आली आहे. या ठिकाणी एकूण 250 अशा स्मृतिशिळा आढळतात. त्यापैकी 150 या अजूनही बऱ्यापैकी स्थितीत असून उर्वरित 100 या काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत किंवा केल्या आहेत, असा दावा पुराणवस्तु संशोधक करतात.

या किल्ल्याला दोन प्रवेशद्वारं आहेत. चार पाण्याचे बारव, अंबारकोठ्या, शस्त्रकोठ्या इत्यादींनी सज्ज असलेल्या या किल्ल्यात धान्य आणि भाजीपाल्याची शेतीही केली जाते. सध्या हा किल्ला पर्यटकाच्या आकर्षणाचं केंद्र झाला आहे. अनेक जण येथे पर्यटन, प्रीवेडिंग शूट किंवा इतर चित्रीकरणासाठी येथे येतात. त्यांच्याकडून या किल्ल्यातील ऐतिहासिक ठेव्याला हानी पोहोचवली जाते. रीलच्या निमित्ताने घडलेला प्रकार हा त्यातील असल्याचं म्हणत श्रीदत्त राऊत यांनी पुरातत्त्व विभागाला याची तक्रार केली. मात्र, पुरातत्व विभागाने असं काही घडल्याची माहिती नसून आपल्यालाच शहानिशा करण्यास सांगत उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.