तरुणाच्या धमकीला कंटाळून मुलीच्या वडिलांची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मी तुमच्या मुलीसोबतच लग्न करणार आहे; तुम्हाला काय करायचे ते करा. जर तुम्ही माझे तिच्यासोबत लग्न लावून दिले नाही, तर तिचे कोठेही लग्न होऊ देणार नाही,’ अशी धमकी तरुणाने दिल्यामुळे मुलीच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 7 मे रोजी हडपसरमधील गोंधळेनगर परिसरात घडली. मुकेश गोपाळ देढे (वय 21, रा. चंदननगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. परमेश्वर रमेश पात्रे ( वय 40) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. जया परमेश्वर पात्रे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पात्रे दाम्पत्याला मुलगी असून, तिचे नाव अनुराधा आहे. जून 2022 पासून आरोपी मुकेश हा संबंधित कुटुंबाला मानसिक त्रास देत अनुराधासोबत लग्न करणार असल्याचे सांगत होता. ‘मी तुमच्या मुलीसोबतच लग्न करणार आहे; तुम्हाला काय करायचे ते करा. जर तुम्ही माझे तिच्यासोबत लग्न लावून दिले नाही, तर तिचे कोठेही लग्न होऊ देणार नाही,’ अशी धमकी त्याने दिली होती. त्यामुळे त्रासाला कंटाळून परमेश्वर यांनी घरासमोरील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.