
मनाली–लेह–खार्दुंगला या सायकल मोहिमेच्या प्रवासवर्णनाच्या मागच्या भागात सायकलने जिस्पा–झिंग–झिंग बार–सूरज ताल या मार्गातील अनुभव वाचले. या भागात बारालच्छा ला–सारचू पठार–नकीला पास–व्हिस्की नाला–लाचुंगला पास हा टप्पा बघू या…
शुभ्र हिमाचा चमचमणारा मुकुट घातलेली काळी पर्वतशिखरे आणि त्या काळ्याच्या गडद चॉकलेटी, तपकिरी अशा उताराकडे फिक्कट होत जाणाऱया रंगछटा, त्यावर मुक्तहस्ताने काढलेल्या धबधब्यांच्या दिमाखदार पांढऱया रेषा, दरीत खोल पसरलेला हिरवा गालिचा असा दिसला बारालच्छा ला. थोडा उतार संपल्यावर विस्तीर्ण पठार, त्याच्या दोहोबाजूला पर्वत, मधोमध चाललेला काळा रस्ता, रस्त्याच्या बाजूला हिरव्या कुरणांमध्ये चरणारे शेळ्यामेंढय़ांचे मोठाले कळप असे सारचू पठार आले. या सारचू पठारावर रस्त्याच्या मधोमध फोटो काढण्याची हौस पुरवून कँपकडे रवाना झालो.
सारचू ते व्हिस्की नाला (13907) हे 48 किलोमीटरचे अंतर कापताना 21 हेअरपिन वळणे असणारे गाटा लूप्स आणि नकिला पास (15,547 फूट) हे टप्पे पार करायचे होते आणि हा या प्रवासातला सगळ्यात अवघड टप्पा होता याची पूर्ण कल्पना होती. गाटा लूप्स सुरू झाल्यावर सुरुवातीला लूप्स मोजू लागले आणि 4-5 लूप्स झाल्यावर एक-एक छोटी विश्रांती घेऊ. म्हणजे हे अंतर सहज पार करता येईल अशी व्यूहरचना केली. सुरुवातीचे 4-5 लूप्स झाले आणि ठरल्याप्रमाणे दोन मिनिटे थांबून आणि दोन घोट पाणी पिऊन निघाले. वर ऊन तापत होते, आजूबाजूंनी जाणारी वाहने काळा धूर ओकत होती आणि शेवटी शेवटी दोन हेअरपिन बँडमधले अंतर वाढत वाढत चालले होते.
19 व्या वळणावर गाटा लूप्सची पछाडलेली जागा आली. इथे ट्रक बंद पडला, क्लिनर आजारी पडला. चालक मदतीसाठी विचारणा करायला दूर-दूर चालत गेला. तो परतेपर्यंत क्लिनरचा हिमवादळात सापडून मृत्यू झाला होता. नंतर तिथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. इथे रस्त्याच्या कडेला त्याच्या स्मरणार्थ बांधलेल्या एका दगडी चौथऱयाच्या पुढय़ात प्रवाशांनी पाण्याच्या बाटल्या आणि सिगारेटी वाहून ढीग केला होता. या जागी काही प्रवाशांकडे एक तरुण माणूस येऊन अन्नपाणी वगैरेची मदत मागतो व तो त्या क्लिनरचे भूत आहे अशी दंतकथा आहे.
कसेबसे गाटा लूप्स संपले आणि आता काय नकीला पास येईल, मगच जेवू असा विचार करून पौष्टिक खुराकाचे तोबरे भरून पुढे पुढे जात राहिले. पावणेचार वाजता नकिला पास येईपर्यंत नाकी नऊ आले आणि इथे उत्साही मिथुनदांनी दमदार अभिनंदन करून सगळा थकवा घालवून टाकला आणि कडक गरमागरम चहा, बिस्किटांनी जिवात जीव आला.
नकिला पासनंतरचा सगळा उतार म्हणजे ऑफरोडिंग होते. माझ्या हर्षदासवे तिच्या नाजूक (हायब्रिड) प्रकृतीमुळे ऑफरोडिंग करू शकत नाही. त्यामुळे दगडगोटय़ांतून, खड्डय़ांमधून वगैरे सायकल चालवण्याचा योग क्वचितच आला असेल. माऊंटन बाइक मात्र मला कुठेही बिनदिक्कत घेऊन जात होती. तिनेच मला हात धरून ऑफरोडिंग करायला शिकविले. म्हणूनच तिचे मी ‘ज्ञानदा’ असे नामकरण मनातल्या मनात करून टाकले. खडतर मार्ग संपल्यानंतर व्हिस्की नाला कँपसाइट आली.
व्हिस्की नाला ते पँग यांच्यामध्ये नकीलाच्या बरोबर वरच्या बाजूला असलेला लाचुंगला (16,462फूट) ओलांडायचा होता. आधी दोन्ही बाजूला असलेल्या राकट-दगडी डोंगररांगा आता भुसभुशीत माती-वाळू यांच्या झाल्या होत्या. सुरुवातीला 6-7 किमी चढून गेल्यावर लाचुंगला पास आला. नकीलाच्या तुलनेत हा फारच सुखद अनुभव होता.
नमिता दामले


























































