मनवा नाईक हिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या उबर चालकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका मनवा नाईक हिच्यासोबत उबर चालकाने गैरवर्तन केलं होतं. मनवा हिनेच सोशल मीडियावर पोस्ट करून हा भयंकर अनुभव शेअर केला होता. मनवा नाईकसोबत गैरवर्तन करणाऱ्या उबर चालकाला पोलिसांनी 24 तासात बेड्या ठोकल्या आहेत. तसंच त्याची गाडी देखील जप्त करण्यात आली आहे.

मनवा नाईकने फेसबुकवर पोस्ट शेअर केल्यानंतर वांद्र कुर्ला संकुल परिसरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी त्या उबर चालकाचा शोध घेत त्याला अटक केली आहे. मोहम्मद मुराद आझम अली असे या चालकाचे नाव आहे. तो 24 वर्षांचा असून अँटॉप हिल परिसरात राहतो.

त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन चालवताना फोनवर बोलणं आणि सिग्नल जंप केल्याबद्दल मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली असून सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मनवा हिने शनिवारी प्रवासासाठी उबेर बुक केली होती. बीकेसी परिसरात आल्यानंतर उबेर चालकाने फोनवर बोलायला सुरुवात केली. तिने त्याला तसं न करण्यास सांगितलं, पण त्याने ऐकलं नाही. त्यानंतर त्याने सिग्नलही तोडला. त्यावर मनवा यांनी त्याला पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने ऐकलं नाही. थोड्यावेळाने ट्रॅफिक पोलिसांनी त्याला अडवलं. त्याच्या गाडीचा फोटो काढला. त्यावर तो पोलिसाशी वाद घालू लागला. मनवा यांना इच्छित स्थळी पोहोचण्यास उशिर होत असल्याने त्यांनी मध्ये पडून पोलिसांना त्याला जाऊ देण्याची विनंती केली. त्यावर सदर चालकाने त्यांच्याशी उद्धट वर्तन केलं. तरीही प्रवास सुरू ठेवण्याचा निर्णय मनवा यांनी घेतला. प्रवास सुरू होताच त्या चालकाने मनवा यांना धमकावयला सुरुवात केली. मनवा यांनी त्याला गाडी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यास सांगितलं. पण, त्याने वाद घालायला सुरुवात केली. दरम्यान त्याने दोन वेळा गाडी उभी करण्याचा प्रयत्न केला आणि तो मनवा यांना धमकवू लागला. मनवा यांनी उबेर सेफ्टीला कॉल केला पण उबेरचा प्रतिनिधी अन्य कॉलवर व्यग्र होता. याच वेळी चालकाना गाडी भरधाव वेगात चुनाभट्टीच्या दिशेने न्यायला सुरुवात केली आणि कुणाला तरी फोन केला. मनवा यांनी त्याला गाडी थांबवायला सांगितलं. पण, त्याने गाडी थांबवली नाही. अखेर मनवा यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यांच्या ओरड्यामुळे सतर्क झालेल्या दोन बाईक चालक आणि एका रिक्षा चालकाने गाडीला घेराव टाकून ती थांबवली आणि मनवा यांची सुखरूप सुटका झाली. मी सध्या सुरक्षित असले तरी प्रचंड घाबरले आहे, असं मनवा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.