
मंगलोर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या कोरोना बाधित रुग्णासोबत प्रवास करणाऱ्या रत्नागिरीतील 6 प्रवाशांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. याच डब्यातून प्रवास करणारा सिंधुदुर्ग येथील सहप्रवासी कोरोना बाधित आढळून आला होता. रत्नागिरी जिल्ह्यात होम क्वारंटाईन खाली ठेवण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 700 इतकी असून जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी एकाला निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्यानंतर घरी परतण्यासाठी चाकरमानी वेगवेगळ्या शकला लढवत आहेत. गेल्या दोन दिवसात मच्छीमारी नौकांवरून प्रवासी गावी आले. समुद्र मार्गे येणाऱ्यांना रोखण्यासाठी आता समुद्रगस्त सुरू करण्यात आली आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आदेशानुसार फिनोलेक्स कंपनीने समुद्र गस्तीसाठी खास टगबोट उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगलमुगले, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरीचे एन. व्ही. भादुले, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी जे. डी. सावंत, सहायक बंदर निरीक्षक सुहास गुरव यांच्यासोबत मुंबईहून रत्नागिरीमध्ये समुद्रमार्गे होणारी अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी विशेष गस्ती अभियान सुरू करण्यात आले आहे.
आता रत्नागिरीतील छोट्या रस्त्यांवरून देखील
निर्जंतुकीकरण केले जाणार – प्रदीप साळवी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील सर्व मोठे रस्ते क्लोरिनचा हायडोस मारून निर्जंतुकीकरण करण्यात आले. नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्या या कामाबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले. आता शहरातील छोटे रस्ते, गल्ली बोळ निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी घेतला आहे. छोट्या गाडीवर टाकी चढवून आंबा फवारणीच्या पंपाद्वारे ही फवारणी केली जाणार असून अनेक नागरिकांनी याबाबत मागणी केली होती.

























































