माणगावच्या सणसवाडीतील अंबेमातेचा सुवर्ण महोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माणगाव परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील सणसवाडी येथे अंबेमातेचा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात गावात पालखी सोहळा, देवीचा जागर, हळदी कुंकू, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम पार पडले.

निळे-भगाड एमआयडीसीतील सणसवाडी येथील उभारण्यात आलेल्या अंबेमाता मंदिराचा ५० वा वर्धापनदिन मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी जय अंबे तरुण मंडळ मुंबई, जय अंबे तरुण मंडळ सूरत आणि स्थानिक ग्रामस्थ मंडळाने विशेष परिश्रम घेतले. यावेळी महिलांसाठी हळदी-कुंकूचा कार्यक्रमही घेण्यात आला. मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात शेकडो ग्रामस्थांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली.

रायगड भूषण पुरस्कार विजेते कीर्तनकार किरण महाराज यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलावडे, शाखाप्रमुख दिनेश बामुगडे, मराठी पाऊल पडते पुढेचे सायम यांनाही सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जय अंबे माता मंडळाचे अध्यक्ष कृष्णा बामुगडे, निवृत्ती नलावडे, दत्तू म्हस्के, नरेश म्हस्के, कृष्णा पावेकर, उत्तम कदम, भरत म्हस्के, मधुकर कदम, अशोक साने आदी उपस्थित होते.