अवलिया – पाठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मंगेश उदगिरकर

आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते.  हे  तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.

पाठक आमच्याच बँकेतला. गमत्या आणि दिलदार! एकाच बँकेत असलो तरी आम्ही एकत्र कधी काम केले नाही. मी परभणी आणि तो गंगाखेडला. नंतर त्याच्या ब्रॅंचेस बदलत गेल्या आणि तो बऱयाच ठिकाणचे पाणी पिऊन आता सेवानिवृत्त झाला आहे. डोक्यावरच्या केसांचा झक्क भांग पाडलेला. किंचित वर चढलेल्या भुवया, त्याखाली हसरे डोळे, सरळ नाकाखाली मिश्यांचा पिरॅमिड, सडसडीत अंगकाठी, कायम इनशर्ट, बोलण्याची धाटणी अशी लाघवी की, कसलाही पत्थरदिल याच्यापुढे मेणासारखा विरघळला पाहिजे. याला बोलताना पाहिला की,  मला  नेहमी जॉनी वॉकरची आठवण येते. याला मी कधीच गंभीर होताना पाहिले नाही. याच्या पांचटपणाला कंटाळून मी कधी कधी  गंभीर व्हायचो, तेही फक्त पाचेक मिनिटे! नंतर तो असं काही बोलतो की, कितीही दाबलं तरी हसू फुटतंच!

“पाठक्या, अरे कधीतरी सीरियस होत जा!”

“मालक! अरे, हसल्याने माणूस छान दिसतो!  तुझंच बघ, एकतर तुझा हा जाड चश्मा, काहीतरी गंभीर विचार केल्याने चेहऱयाची कळा गेलेली!  पाहवत नाही रे तुझ्याकडे!  म्हणून मी तुला शाब्दिक गुदगुल्या करत असतो! आता पहा बरं, हसलास की नाही? हसल्यावर तू माझ्यापेक्षा सुंदर दिसतोस!” अशा वेळी त्याच्या गालफडे बसलेल्या ‘सुंदर’ चेहऱयाकडे पाहून खरेच मला हसू फुटलेले असते!

“ए, ए, मालक, खरंच तू छान दिसतोस बरं का!” बँकेत मला सगळे ‘मालक’ या नावानेच हाक मारत होते आणि अजूनही याच नावाने ओळखतात. का? माहीत नाही.

याची बायको म्हणजे आमची वहिनी बीडीओ पदावर, दोन हुशार मुली असा याचा चौकोनी सुखाचा संसार. याने नाना खटपटी करून शारीरिक व्यंग असलेले सर्टिफिकेट मिळवले होते. व्यंग अफलातून होते. कर्णबधिर! बस, रेल्वेमध्ये आम्ही बऱयाच वेळा एकत्र प्रवास करताना आमच्या गप्पा व्यवस्थित चालायच्या. हसणे, खिदळणे चालू असताना मध्येच कंडक्टर, टीसी आला की, याचा अभिनय सुरू व्हायचा! कानावर हात ठेवून त्याला दहावेळा बोलायला लावून मग तिकीट काढायचा किंवा दाखवायचा! तेही याच्याकडे संशयाने पहायचे, पण काही करू शकत नसत. हा मला डोळा मारून हसायचा. या सर्टिफिकेटमुळे याला पाव तिकीट! गाडीने चालला तर टोल माफ, इन्कम

टॅक्समध्ये सूट, प्रोफेशनल टॅक्स माफ!

“पाठक्या, अरे, माझेही डोळे अधू आहेत! काहीतरी कर की!”

“मालक! अरे, आम्ही जन्मजात भिक्षुक, हे आम्हाला शोभतं, तुला नाही!” म्हणून वेळ मारून न्यायचा.

आईकडे गेला की, “म्हातारे!” म्हणून गळ्यात पडायचा! हा एक मिस्कील तर आई दहा मिस्कील!

“आला टोणगा! मेल्या काहीतरी पाहिजे असल्याशिवाय तू असा लाडात यायचा नाहीस! मी तुला आता छदाम देणार नाही, सांगून ठेवते!”

“आई, आता तुझं वय झालंय! काय करणारेस पैशाचं! अगं, माझ्यासारख्या तुझ्या आज्ञाधारक पुत्राला काही दिलंस तर नक्की स्वर्गात पोचशील बघ!”

“अरे दुष्टा! माझ्या मरणाची वाट बघतोस होय रे नतद्रष्टा!”

“छे, छे, तू गेल्यावर मी कुणाला मागणार? आता तू पैसे दिलेस की, अगोदर सव्वा रुपयाचे पेढे देवाला लाच देणार आणि तुला निदान शंभर वर्षे द्यायला सांगणार!”

“…आणि तो तुझं ऐकणार होय रे काळतोंडय़ा?”

“अगं, तूच माझं नाव ठेवलंस ना ‘नारायण’, मग?”

एव्हाना म्हातारी बोळकं पसरून हसायला लागलेली.

“घे मेल्या!” असं म्हणून त्याच्या हातात नोटा कोंबायची!

“चला मालक! देवस्थानाला जायची वेळ झाली!” याचे देवस्थान म्हणजे कुठला तरी बार!

याच्या पोरीही याच्यावरच गेलेल्या! गुणवान, हुशार आणि हसऱया! या कुटुंबाला पाहिलं की, दु:ख यांच्या घरचा उंबरा ओलांडू शकले नाही याची जाणीव होऊन जाते. या घरातली माऊली तशी चारचौघीसारखी साधीसुधी, पण या तिघांच्या नादाने तीही बिघडत गेली! यांच्या आनंदी कटात सामील झाली!

आता आम्ही दुरावलो आहोत. मनाने नव्हे, तर अंतराने. कधीमधी त्याचा फोन येतो  तेव्हा प्रपातासारखा  याच्या गप्पांचा गिरसप्पा ‘धो धो’ कोसळत असतो. हसत असतो, चिमटे काढत असतो. मलाही हसणे अनावर होऊन डोळ्यांत पाणी जमा होते!

नारायण पाठक! माझ्या आयुष्यात मला जिथे म्हणून मन रिझवणाऱया, उभारी देणाऱया व्यक्ती भेटल्या, त्यात याचा समावेश अग्रभागी! हा माझ्यापेक्षा वयाने लहान असल्याने केवळ वयाचा आधार घेऊन याला आशीर्वाद देतो, “सुखी रहा, हसत रहा!” पाठक्या वाचतोयस ना?

[email protected]