मनमाड शहराला 18 दिवसाआड पाणीपुरवठा

सामना ऑनलाईन|मनमाड

पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला असून यादरम्यान मनमाड शहर व परिसरात 5 ते 6 वेळा मध्यम व जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. त्यातून मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱया वाघदर्डी धरणात सुमारे साडेतीन फूट म्हणजे 5 दलघफूट पाणी आले आहे. आज पावसाळा सुरू होऊन महिना झाला तरी शहराला 17 ते 18 दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. धरणात अपेक्षित पाणीसाठा होऊ शकला नसल्याने ही परिस्थिती ओढवलेली आहे.

शहरांतील सुमारे साडेचारशे कूपनलिकांना महिनाभरात झालेल्या पावसाने थोडे फार पाणी आले. तसेच काही खासगी विहिरींनाही पाणी आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची तीव्रता काही अंशी कमी झाली आहे. मनमाड शहर आणि परिसरात शनिवारी सकाळी आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली. गेल्या आठवडय़ात सलग तीन दिवस आर्द्राचा पाऊस चांगलाच बरसला होता, त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली होती.

आज झालेल्या पावसामुळे मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱया वाघदर्डी धरणात सुमारे साडेतीन फूट म्हणजे 5 दशघफूट पाणी आले आहे. सध्या पाटोदा येथील साठवणूक तलावात 8 दलघफूट पाणी शिल्लक आहे. म्हणजे एकूण 13 दलघफूट पाणी असून ते सुमारे दीड महिना पुरू शकते तर ऑगस्टमध्ये पालखेडचे एक रोटेशन मिळणार आहे. वाघदर्डी धरणाच्या आधी पांझण नदीवर सुमारे 12 ते 13 छोटे बंधारे बांधण्यात आलेले आहेत व ते संपूर्ण भरल्याशिवाय नदीतून पाणी पुढे सरकत नाही. त्यामुळे पावसाळा सुरू होऊन महिनाभरात चार वेळा मध्यम व जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊनही वाघदर्डी धरणात अपेक्षित पाणीसाठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे आजही भरपावसाळय़ात शहराला 16 ते 17 दिवसांआड 1 तास नळाद्वारे नगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा सुरू आहे.

शहर व तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा असताना गेल्या चार दिवसांपासून कधी सूर्यप्रकाश तर कधी ढगाळ वातावरण अशी परिस्थिती होती. पावसाचे काळे ढग जमा होऊनही पाऊस बरसत नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे सावट पसरले असताना शुक्रवार व शनिवारी काही काळ पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. दरम्यान जुलैपासूनच शहर व परिसरात पेरण्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता दमदार सातत्यपूर्ण पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या