मनोज जरांगे यांची तब्येत खालावली, आजपासून गावागावात आमरण उपोषण

केंद्र तसेच राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत अजिबात गंभीर नाही. त्यामुळे नाइलाजास्तव आम्हाला आंदोलन उग्र करावे लागत आहे. रविवारपासून मराठा आरक्षणासाठी गावागावांत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असून कोणत्याही राजकीय नेत्याला गावात पाय ठेवू देणार नाही. आंदोलनादरम्यान कोणाचे काही बरेवाईट झाल्यास त्याची जबाबदारी सरकारवर असेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणासाठी आज मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनाचा दुसरा टप्पा जाहीर केला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यातील गावागावात जेथे जेथे साखळी उपोषण सुरू आहे, रविवारी त्याचे रूपांतर आमरण उपोषणात करा. कोणीही आत्महत्या करू नका, कोणाला करू देऊ नका. आमरण उपोषणात हजारो लोक सहभागी होणार आहेत. उपोषणादरम्यान कोणाचे काही बरेवाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही जरांगे यांनी दिला. उपोषणकर्त्यांनी पाणी पिऊन उपोषण करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. देशातील हे सर्वात मोठे आंदोलन असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राजकीय नेत्यांनी मुंबईत जमावे

मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना आम्ही गावबंदी केली आहे. राजकीय नेते, आमदार, खासदार, मंत्र्यांनी गावात येऊन उगाचच वातावरण भडकावण्याचा प्रयत्न करू नये. त्यापेक्षा त्यांनी मुंबईत एकत्र जमून मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणावा, असे मनोज जरांगे म्हणाले.

आंदोलनाचा तिसरा टप्पा 31 ऑक्टोबरला ठरणार

मराठा समाजातील गोरगरीबांच्या कल्याणासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. आमच्या लेकरांना न्याय मिळालाच पाहिजे. त्यासाठी त्यांनी किती दिवस वाट बघायची? असा सवाल करतानाच मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा तिसरा टप्पा 31 ऑक्टोबरला ठरणार असल्याची माहिती दिली.

चर्चेला आल्यास अडवणार नाही

मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चेसाठी सरकार येणार असेल तर त्याला आम्ही अडवणार नाही, असे म्हणत जरांगे यांनी संवादाची कवाडे खुली असल्याचे संकेत दिले. मात्र आरक्षणाशिवाय तडजोड नाही, असे म्हणत आपल्या ठाम भूमिकेचा पुनरुच्चार केला. सरकारने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

दिल्लीत बसून काय बोलता…

मराठा आरक्षण आंदोलन हिंसक होऊ देऊ नका, अशा प्रकारच्या सूचना दिल्लीतून आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा… दिल्लीत बसून काय बोलता? त्यापेक्षा राज्य सरकारला मराठा आरक्षण देण्याचे आदेश द्या! असे खडे बोल मनोज जरांगे यांनी सुनावले.

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता. अन्न तसेच पाणी नसल्यामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली असून त्यांचा आवाज क्षीण झाला आहे. बोलताना त्यांना धाप लागत आहे. शरीरातील पाणी पातळी कमी झाल्याने थकवा जाणवत आहे. जरांगे यांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथक आले होते. मात्र त्यांनी तपासणी तसेच उपचारास नकार दिल्याने वैद्यकीय पथक परत गेले.

मिंधे सरकारला धडकी, आरक्षण उपसमितीची उद्या मंत्रालयात तातडीची बैठक

आरक्षणासाठी मराठा समाज दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत आहे. आमरण उपोषण, मंत्री व राजकीय नेत्यांना गावबंदी, जलसमाधी, बहिष्कार अशा विविध पद्धतीने राज्यभरात आंदोलन पेटले आहे. अनेक मराठा तरुणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्याही केल्या. त्यामुळे मिंधे सरकारला धडकी भरली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात तत्पर पावले उचलणे सरकारला क्रमप्राप्त झाले असून त्यासंदर्भात मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी सकाळी मंत्रालयात बोलवण्यात आली आहे.

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. सोमवारी सकाळी 10 वाजता मंत्रालयात चंद्रकांत पाटील यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समिती मराठवाडय़ातील मराठा समाजबांधवांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करत आहे. ती समिती आतापर्यंत केलेल्या कामकाजाची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीसमोर देणार आहे.

सरकारविरोधात उद्रेक… अजित पवारांची बारामतीतच कोंडी; भागवत कराडांचा ताफा अडवला

राज्यात सरकारविरोधात उद्रेक पाहायला मिळत आहे. आज बारामतीतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काsंडी झाली. मराठा आंदोलक आक्रमक झाल्यामुळे माळेगाव साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभास जाणे अजित पवारांनी टाळलं. नांदेडमध्ये पेंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचा ताफा रोखून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले, तर साताऱयात मंत्री शंभुराज देसाई यांना घेराव घालण्यात आला. मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्या. लोकांची लेकरं मरत असताना मजा बघू नका. हे तुम्हाला अतिशय जड जाईल. मराठा समाजाला आरक्षण द्या… आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू.