
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत येत्या 30 मे पासून आमरण उपोषणाला बसणार आहेत असे जाहीर केले आहे. जरांगे यांनी अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेत त्यांच्या आंदोलनाची माहिती दिली. तसेच यावेळी त्यांनी ”या रखरखत्या उन्हात उपोषणाला बसणार आहे. त्यावेळी उष्माघाताने माझं काही बरं वाईट झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल”, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
”यावेळी ३० मे पासून रखरखत्या उन्हात उपोषण करणार आहे. उपोषणादरम्यान मला काही झालं, उष्माघातानं माझं काही बरं वाईट झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल. यावेळी एक तर सरकारचा तुकडा पडेल नाहीतर माझा”, असे जरांगे पाटील म्हणाले.
यावेळी मी रखरखत्या उन्हात बाज टाकून उपोषण करणार आहे. पायात चप्पल नसेल, अन्नपाणी नसेल, काय व्हायचं ते होऊ द्या, असंही जरांगे म्हणाले. यावेळी जरांगे यांनी मराठा समाजातील बांधवांनी अंतरवाली सराटीकडे येऊ नये असे आवाहन देखील केले आहे.




























































