जरांगेंची प्रकृती खालावली; मी मेलो तर मला सरकारच्या दारी टाका!

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाच दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली. नाकातून रक्तस्राव होत असल्यामुळे त्यांना जबरदस्तीने दोन सलाईन देण्यात आले. मात्र त्यांनी तिसरे सलाईन काढून टाकले. मी कोणतेही उपचार घेणार नाही. मी मरायला तयार आहे. मी सरकारला सोडणार नाही. मेलो तर मला सरकारच्या दारी नेऊन टाका, असे कातर आवाजात जरांगे यांनी ठणकावले. एकटय़ानेच मुंबईत जाऊन आंदोलन करण्याचा निर्धारही त्यांनी केला.

सग्यासोयऱयांच्या संदर्भातील अध्यादेशात स्पष्टता यावी, कुणबी नोंदी मिळालेल्यांना प्रमाणपत्र वाटप आदी मागण्यांसाठी 10 फेब्रुवारीपासून जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. आज शरीरातील पाणी कमी झाल्याने त्यांची प्रकृती खालावली. सकाळी नाकातून अचानक रक्तस्राव झाल्याने उपोषण स्थळी एकच खळबळ उडाली. आरोग्य विभागाच्या पथकाने उपचार करण्याची तयारी दाखवली. परंतु जरांगे यांनी उपचार नाकारले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉ. विनोद चावरे यांना पाचारण केले. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज हेदेखील आले.

मराठवाडय़ात ठिकठिकाणी बंद
मराठवाडय़ात बीड, जालना, धाराशीव, लातूर या जिह्यांमध्ये ठिकठिकाणी बंद पुकारण्यात आला. नाशिक, मालेगाव येथेही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

औषधोपचार घेणार की नाही?
मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील औषधोपचार घेणार आहेत की नाहीत. कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही. सर्वसामान्य नागरिक भरडले जाणार नाहीत याची काळजी घेणार की नाही, या मुद्यांवर माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी जरांगे-पाटील यांचे वकील रमेश दुबे-पाटील यांना दिले.