गोळ्या घातल्या तरी माघार नाही, आरक्षण ओबीसीतूनच घेणार! मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून पाच महिन्यांपासून लढत आहोत. आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही, पण आरक्षण ओबीसीतूनच घेणार, असा ठाम निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला. मुंबईत होणार्‍या आंदोलनाची माहिती तसेच मार्गाविषयीची माहिती गुरुवारी माध्यमांना देणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनोज जरांगे यांच्यावर गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आज हॉस्पिटलमध्येच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी पाच महिन्यांपासून आम्ही लढा देत आहोत. हे आंदोलन आता लोकांचे आंदोलन बनले आहे. सरकारने ठरल्याप्रमाणे सरसकट मराठा आरक्षण द्यावे, या मागणीवर आपण ठाम असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने 24 डिसेंबरपर्यंतची मुदत मागून घेतली होती. परंतु सरकारने शब्द फिरवला. सगेसोयरे या शब्दावरून घोळ घातला. मान्यवरांच्या उपस्थितीत जे ठरले आहे, तेवढेच द्या एवढेच आमचे मागणे आहे. परंतु सरकारने दगाफटका केला. त्यामुळे पुढील आंदोलन मुंबईत होणार आहे. 20 जानेवारीला आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे कूच करणार असून, भविष्यात मुलाबाळांचे हाल होऊ नयेत म्हणून प्रत्येक मराठ्याने घराबाहेर पडावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आंदोलन मार्गाची आज माहिती देणार

20 जानेवारी रोजी आंतरवाली सराटी येथून सकाळी 9 वाजता मराठा आंदोलक मुंबईकडे कूच करणार आहेत. हा मार्ग कसा असेल, कोणत्या मार्गाने जायचे यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. ते पाहणी करत आहेत. आंदोलक पायी, ट्रॅक्टर, ट्रकबरोबरच मिळतील ती वाहने घेऊन मुंबईकडे निघणार आहेत. याविषयी विस्ताराने गुरुवारी माध्यमांना माहिती देणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी सांगितले.