
40 दिवसांचा वेळ द्या आरक्षण देतो असं म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना ज्युस पाजून उपोषण सोडायला लावले. 40 दिवस पूर्ण झाले तरीही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द खोटा ठरल्याचं मनोज जरांगे-पाटील आणि मराठा समाजाला कळून चुकले आहे. जरांगे पाटील यांनी आपण आजपासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात करणार असून यावेळी आपण वैद्यकीय उपचारही घेणार नाही असे जाहीर केले आहे.
तुम्ही काही करत नाही यात आमची चूक काय ?
उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी जरांगे पाटील यांच्याशी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून संवाद साधला. तुम्ही उपोषण करू नका अशी विनंती महाजन यांनी केली, यावर संतापलेल्या जरांगे पाटील यांनी तुम्ही काही करत नाही यात आमची चूक काय ? असा सवाल विचारला. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की या आंदोलनादरम्यान मराठा समाजातील आंदोलकांवर दाखल झालेले खटले 2 दिवसात मागे घेऊ असे सांगितले. ते आजही मागे घेण्यात आलेले नाहीत असे जरांगे पाटील यांनी महाजनांना सांगितले. आम्ही ते मागे घेतो असं महाजनांनी गुळमुळीत उत्तर दिले असता जरांगे पाटील यांनी म्हटले की, ते खटले आम्ही आंदोलन केले तर आम्हाला धाक दाखवण्यासाठी म्हणून ठेवले आहेत. आम्हाला धाक दाखवून आंदोलन होऊ द्यायचे नाही असा प्रयत्न सरकारचा असल्याचा संशय जरांगे-पाटील यांनी बोलून दाखवला.
मंत्री नुसती गणितच करत बसले आहेत
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा आढावा घेण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीवरूनही जरांगे पाटील यांनी महाजन यांना सुनावले. तुमची समिती काम करत नाही, 15 दिवसात समितीने कामच नाही केलं. कुठून गणितशास्त्रज्ञ आणलेत तुम्ही काय माहिती. काम धंदा नसलेले मंत्री नुसती गणितच करत बसले आहेत. अशा शब्दात जरांगे पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला.
सरकार आरक्षणाचा तिढा सोडवण्यात सपशेल अपयशी ठरले. आता सरकारला एक तासाचाही वेळ मिळणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, अजिबात मागे हटणार नाही असे जरांगे-पाटील यांनी सरकारला मंगळवारीच बजावले होते. आज जरांगे- पाटील यांनी धनगर आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला असून पेटून उठण्याचे आवाहन केले. त्यामुळे आता मिंधे सरकारच्या तोंडाला फेस येणार आहे. चौंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या धनगर मेळावा कार्यक्रमात मंगळवारी मनोज जरांगे-पाटील यांनी सहभाग घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यानिमित्त शिवरायांसमोर जाऊन मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतली. यावर मनोज जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली त्याचा आदर करतो. परंतु, जोपर्यंत आरक्षण देणार नाही तोपर्यंत आरक्षणाचा लढा सुरूच राहणार, अजिबात मागे हटणार नाही. आता आम्ही पुन्हा आंदोलन सुरू करणार असून आमरण उपोषणावर ठाम असल्याचे जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले.


























































