शुभेच्छांचा वर्षाव! आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aaditya

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसैनिक, युवासैनिकांसह तरुणाईची गुरवारी रीघ लागली होती. ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, ‘आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांच्या निनादात महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आणि आबालवृद्धांनी आदित्य ठाकरे यांचे अभीष्टचिंतन केले आणि पुढील राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. ‘मातोश्री’ निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर मंच उभारण्यात आला होता. त्यावर ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ अशा अक्षरांची फुलांची सजावट करण्यात आली होती. आदित्य ठाकरे यांचे मंचावर आगमन होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पुष्पगुच्छ, केक तसेच आदित्य ठाकरे यांच्या छायाचित्राची फ्रेम, स्केचेस, तलवार अशा भेटवस्तू देऊन आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. महाराष्ट्रासह पंजाब, बिहार तसेच अन्य राज्यांतूनही कार्यकर्ते आले होते. प्रत्येक कार्यकर्त्याची आदित्य ठाकरे यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

त्यानंतर मनोहर जोशी, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, शिवसेना उपनेते व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजकुमार बाफना, विभागप्रमुख-आमदार ऍड. अनिल परब, आमदार अजय चौधरी, सदा सरवणकर, संजय पोतनीस, आमदार विलास पोतनीस, सुनील राऊत, सुनील शिंदे, मंगेश कुडाळकर, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, युवासेनेचे अमेय घोले, अमोल कीर्तिकर, पूर्वेश सरनाईक, युवासेनेचे सर्व सिनेट सदस्य यांच्यासह खासदार, आमदार, विभागप्रमुख, नगरसेवक, शिवसेना संलग्न संघटनांचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनीही अभीष्टचिंतन केले.

शेतकऱयांच्या मुलांकडूनही शुभेच्छा
आत्महत्या केलेल्या शेतकऱयांची मुलेही आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी आली होती. ‘आई तुळजाभवानीच्या कृपेने आपणास उदंड आयुष्य लाभो!’ असा बॅनर घेऊन ही मुले नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातून आली होती. ‘शेतकऱयांनो, आत्महत्या करू नका’ असे आवाहन करणाऱया टोप्याही त्यांनी परिधान केल्या होत्या. आदित्य ठाकरे यांनी मंचावरून खाली उतरून या मुलांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.