Maratha Reservation – राज्य सरकार आणि जरांगे-पाटलांच्या शिष्टमंडळामध्ये बैठक, बंद लिफाफा जालन्याकडे रवाना

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या 12-13 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांचे शिष्टमंडळ आणि राज्य सरकारमध्ये शुक्रवारी रात्री एक महत्त्वाची बैठक पार पडली. जवळपास अडीच तास ही बैठक सुरू होती. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असून शिष्टमंडळासोबत बंद लिफाफ्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांना माध्यमांशी बोलताना दिली.

आम्ही पिशव्या भरून तयार आहोत फक्त सरकारच्या निरोपाची वाट आहे, असे मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटले होते. त्यानंतर सरकारचा चर्चेचा निरोप घेऊन प्रभारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे तातडीने आले. त्यानंतर सायंकाळच्या विमानाने अध्यादेशातील दुरुस्तीसाठी शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाले. सह्याद्री अतिथीगृहावर या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच आरक्षणासंदर्भातील संबंधितांशी चर्चा केली.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाची शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत एक बैठक झाली झाली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, उदय सामंत, दादा भुसे तसेच नारायण कुचे, प्रवीण दरेकर, अर्जुन खोतकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भरत गोगावले, राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ, मुख्य सचिव, विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. मराठवाड्यातील जिल्हाधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित होते.

फडणवीस यांची प्रतिक्रिया

मराठा आरक्षण न्यायालयात टिकवण्यासाठी ते अभ्यासपूर्ण असणे आवश्यक आहे. मराठा आरक्षणाचा तंतोतंत जीआर काढण्यासाठी काही अवधी मिळाला पाहिजे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन देत आंदोलकांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलिसांची चैकशी करण्यात येईल आणि आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

जरांगे-पाटलांच्या शिष्टमंडळात कोण?

माजी कुलगुरू सर्जेराव निमसे (आरक्षण विषयातील तज्ज्ञ)
नरेंद्र पाटील (अण्णासाहेब महामंडळाचे अध्यक्ष)
प्रदीप पाटील (आमदार हरिभाऊ बागडे यांचे समर्थक)
किशोर चव्हाण (मराठा आंदोलक)
प्रा. डॉ. शिवानंद भानुसे (संभाजी ब्रिगेड प्रवक्ता)
चंद्रकांत शेळके (तहसीलदार)
प्रदीप एकशिंगे (सहायक पोलीस निरीक्षक)
किरण तारख (ग्रामस्थ, आंतरवाली सराटी)
पांडुरंग तारख (ग्रामस्थ, आंतरवाली सराटी)
श्रीराम कुरणकर (आंदोलक, जरांगे यांचे निकटवर्तीय)
माजी आमदार अर्जुन खोतकर (सरकारचे प्रतिनिधी)