मराठा आरक्षण: राजकीय नेत्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली; दंगल नियंत्रण पथकंही तैनात

मराठा आरक्षणासाठी सरकारला मुदतीपेक्षा अधिक दिवस दिल्यानंतर देखील आरक्षण देण्यात सरकार असफल ठरल्यानंतर आता हे आंदोलन चिघळलं. मराठवाड्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यात आता मराठा समाज रस्त्यावर उतर असल्याचं दिसत आहे. काही भागात तर हिंसक वळण देखील लागल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू ठेवलं असून त्यांची तब्येत खालावत चालली आहे. मात्र त्याचवेळी आंदोलन शांततेच्या मार्गानं होऊ द्या असं आवाहन त्यांनी केलं. राज्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. आतातर आमदार खासदारांची घरं देखील अज्ञातांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

सोमवारी बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानाला आग लावण्यात आली. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय देखील जाळण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या अजित पवार गटाच्या प्रदेश कार्यालयाची सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नेते, मंत्री, आमदारांच्या बंगल्याबाहेर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि नेते जयदत्त क्षीरसागर यांचे बंगले पेटवण्यात आले. आमदार प्रकाश सोळंके यांचाही बंगला अज्ञात जमावानं जाळला. तसेच प्रकाश सोळंकेंच्या बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या गाड्याही पेटवण्यात आल्या.

यापार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवेंसह शरद पवारांच्या घराबाहेरी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राज्यातील नेत्यांच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अर्जुन खोतकरांच्या जालन्यातील घराची सुरक्षा वाढवली आहे. तर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

जालन्यातील संभाजीनगरमधील रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. तर, अजित पवार, नारायण राणेंसह सर्वच महत्वाचे मंत्री आणि नेत्यांच्या घरांभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हिंसक प्रकार टाळण्यासाठी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

नागपूरमधील भाजप शहर कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ

नागपूरमधील भाजप शहर कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मंगलम कॉम्प्लेक्स येथील भाजप कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरासमोर सुरक्षा वाढवली

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरासमोर सुरक्षा वाढवली आहे.