मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तरी वर्तमान भाषिक परिस्थितीत फरक पडणार नाही. जोपर्यंत मराठी शाळांचे सक्षमीकरण होत नाही, मराठीतून शिक्षण दिले जात नाही, मराठी ज्ञानभाषा, रोजगाराची भाषा होत नाही तोपर्यंत परिस्थितीत बदल होणार नाही. म्हणून वास्तव मार्गाने आपण मराठीच्या संवर्धनाचा आग्रह धरला पाहिजे, असे मत भाषा अभ्यासक, साहित्यिकांनी मांडले.
ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्रकाश परब म्हणाले, अभिजात दर्जाचे फायदे मराठीच्या संवर्धनासाठी नाही, तर ते संशोधन-अध्यापन, सन्मानासाठी आहे. ज्या भाषांना याआधी हा दर्जा मिळालाय त्या तमिळ, तेलगू, कन्नडचे निधी मिळण्याचे अनुभव वाईट आहेत. त्यामुळे अभिजात दर्जाने हुरळून जाऊ नका. आज मराठी शाळांची अवस्था वाईट आहे. उद्योजकांना शाळा दत्तक देण्याची विदारक परिस्थिती आहे. शाळांच्या बाबतीत सरकार जबाबदारी झटकतंय का?. जोपर्यंत मराठी शाळांचे सक्षमीकरण होत नाही तोपर्यंत भाषेचे पाऊल पुढे सरकणार नाही, असे प्रकाश परब म्हणाले. मराठीतून उच्च शिक्षण देण्याविषयी चर्चा होते. पण आधी मराठी शाळा टिकवून पाया मजबूत केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मराठी ज्ञानभाषा, रोजगाराची भाषा व्हावी
राज्याच्या मराठी भाषा धोरणातील तरतुदींची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. त्यावरही बोट ठेवले जात आहे. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, आधुनिक काळात तरुणाई इंग्रजी माध्यमाच्या मागे आहे. मराठी भाषा ज्ञानभाषा, रोजगाराची भाषा व्हायला पाहिजे. त्यादृष्टीने भाषा सल्लागार समितीने काही शिफारशी केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी व्हायला हवी.
आग्रह धरला पाहिजे
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी भांडारकर संस्थेने पुढाकार घेतला. तीन प्राध्यापकांनी त्यात सक्रिय भाग घेऊन 126 पानी अहवाल केंद्र सरकारला सन 2013 मध्ये पाठवला होता. आज त्याची पूर्तता झाली आहे. मराठी शाळा सक्षम झाली पाहिजे, मराठी बोलण्याचा आग्रह सर्वांनी केला पाहिजे. जो मातृभाषेत विचार व्यक्त करतो तो अधिक प्रगल्भ असतो. – राहुल सोलापूरकर, अभिनेते
संशोधन दृष्टीने पुढे नेणे गरजेचे
मराठी भाषा भवन विद्यापीठामध्ये राबविण्यात येत आहे. एक हजार पुस्तके मराठी भाषेत आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संशोधन दृष्टीने ते पुढे नेण्यात येईल. – सुरेश गोसावी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
3 ऑक्टोबरला साजरा होणार मराठी अभिजात भाषा गौरव दिन
3 ऑक्टोबर या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यामुळे हा दिवस ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. यासंदर्भातील ठराव मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी मांडला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे जगभरातील मराठीप्रेमींसाठी अभिमानास्पद, गौरवास्पद आहे, असे त्यात नमूद होते.
दैनंदिन जीवनात वापर वाढावा
जर्मन, फ्रान्स आणि चीन या देशात मातृभाषेत शिक्षण दिले गेल्याने त्यांनी विकास साधला. अभिजात दर्जा टिकवणे हे साहित्यिक, कलाकार यांचे काम आहे. विद्यापीठांमध्ये भाषेचे शिक्षण दिले जाते, पण त्याचा वापर प्रत्यक्षात दैनंदिन जीवनात झाला पाहिजे. इंग्रजी भाषा आपल्याला टाळता येत नाही, पण मराठी भाषा आपल्याला विसरता येणार नाही, ती जिवंत ठेवण्याचे काम आगामी काळात करावे लागेल. – रामदास फुटाणे, साहित्यिक, वात्रटिकाकार
विरोध बाजूला ठेवला पाहिजे
इंग्रजी भाषेला विरोध करणे बाजूला ठेवून आपली भाषा विकसित करण्याचे धोरण अवलंबण्यात यावे. मराठी भाषा सर्व शाळांत बंधनकारक करावी. त्यात मराठी भाषा संस्पृती समाविष्ट करण्यात यावी. इतरांचा द्वेष न करता आपली भाषा प्रगल्भ करावी. – आनंद माडगूळकर, साहित्यिक