संतोष पवारच्या मनात भरली ‘सुंदरा’

अभिनेता संतोष पवार यांचे नवे नाटक रंगभूमीवर आले आहे. ‘सुंदरा मनात भरली’ असे नाटकाचे नाव आहे. ‘सुंदरा मनात भरली’ ही शाहीर राम जोशी यांची लोकप्रिय लावणी आहे. अनेक वर्षांनंतरही ही लावणी रसिकांच्या मनात ताजी आहे. आता याच लावणीची आठवण करून देत रंगकर्मी संतोष पवार याने याच नावाने नवीन नाटक आणले आहे.

‘सुंदरा मनात भरली’ नाटकाचे लेखन व दिग्दर्शन संतोष पवार याचे आहे. नाटकाचा बाज लोकनाटय़ाचा असला तरी त्यातल्या विविध प्रसंगांमुळे हे नाटक धमाल करमणूक करण्याची खात्री देते. पण या नाटकातली ‘सुंदरा’ कोण हे मात्र प्रेक्षकांना नाटक पाहिल्यावरच कळणार आहे. लावण्यांची फोडणीही या नाटकाला मिळाली आहे. विकास समुद्रे, प्रशांत शेटे, रामदास मुंजाळ, ऋषिकेश शिंदे, स्मृती बडदे यांच्यासह स्वतः संतोष पवार या नाटकात भूमिका साकारत आहे. विनोद नाखवा यांची ही निर्मिती आहे.