मराठी पत्रकार परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा, पंढरीनाथ सावंत यांना ‘जीवनगौरव’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठsचा ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक ‘मार्मिक’चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांना जाहीर झाला आहे. 25 हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. उरुळी कांचन येथे डिसेंबरमध्ये होणाऱया परिषदेच्या अधिवेशनात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी राज्यातील पत्रकारांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. दर्पणकारांच्या नावाने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी दिनू रणदिवे, मा.गो. वैद्य यांच्यासह अनेक ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात आला आहे. या वर्षी पंढरीनाथ सावंत यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याबरोबरच आचार्य अत्रे यांच्या नावाने विद्यमान संपादकाला दिला जाणारा पुरस्कार ‘झी-24 तास’चे संपादक नीलेश खरे यांना जाहीर झाला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने महिला पत्रकारास दिला जाणारा पुरस्कार दैनिक ‘सकाळ’ (मुंबई )च्या मृणालिनी नानिवडेकर यांना तर  स्व. रावसाहेब गोगटे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार पालघर येथील ज्येष्ठ पत्रकार अच्युत पाटील यांना जाहीर झाला आहे. स्व. नागोरावजी दुधगावकर स्मृती पुरस्कार वसमत येथील दैनिक ‘गाववाला’चे  संस्थापक संपादक उत्तमराव दगडू यांना, तर स्व. दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार दै. ‘पृषिवल’चे वृत्तसंपादक भारत रांजणकर यांना, पत्रकार प्रमोद भागवत स्मृती पुरस्कार दैनिक बेळगाव ‘तरुण भारत’चे सातारा येथील आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांना तर पत्रकार शशिकांत सांडभोर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार दीपक पैतके यांना जाहीर करण्यात आला आहे. अकोल्याचे पत्रकार भगवंतराव इंगळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार दैनिक ‘देशोन्नती’चे बुलढाणा आवृत्ती प्रमुख राजेंद्र काळे यांना जाहीर करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेने स्पष्ट केले आहे.