अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि गोंधळ हे जणू काही समीकरण असल्याची प्रचिती आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या साहित्यिकांना आणि साहित्य रसिकांना आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू असतानाच विदर्भवाद्यांनी स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे अशी घोषणा देत मोठा राडा केला. विदर्भवाद्यांनी केलेल्या या राड्यामुळे यंदाच्या वर्धा साहित्य संमेलनाचा पहिला दिवस चांगलाच गाजला.
संमेलनाचे उद्घाटन सकाळी दहा वाजता होणार होते. सर्व पाहुणेमंडळी व्यासपीठावर उपस्थित होती; मात्र राज्याचे मुख्यमंत्री 11 वाजून 39 मिनिटांनी व्यासपीठावर आले. त्यामुळे आयोजकांनी इतर मान्यवरांच्या भाषणाची वेळ कमी केली आणि मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहिले.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान अचानक वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशा घोषणा सुरू झाल्याने गोंधळ उडाला. घोषणाबाजी सुरू होताच पोलीस गोंधळून गेले. त्यांनी धावाधाव करून घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पकडले आणि त्यांचे तोंड दाबून सभागृहाबाहेर नेले.































































