मराठी सुरक्षा रक्षकांना हाकलण्याचा स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचा डाव

स्टँडर्ड चार्टर्ड या ब्रिटिश मल्टीनॅशनल बँकेने सुरक्षा अधिकाऱयांच्या आदेशावरून प्रामुख्याने मराठी सुरक्षा रक्षकांचा नाना प्रकारे अतोनात जाच सुरू केला आहे. ते सारे सुरक्षारक्षक महाराष्ट्र सरकारच्या सिक्युरिटी बोर्डाचे असून बँकेचे व्यवस्थापन हे एका खासगी सिक्युरिटी एजन्सीच्या प्रेमात पडले आहे. या प्रकरणी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस या कामगार संघटनेने बँकेच्या बीकेसीच्या मुख्यालयातील चीफ एक्सिक्युटीव्ह झरीन दारूवाला यांच्याकडे आणि लंडन येथील ग्रुप चीफ एक्सिक्युटीव्ह बिल विन्टर्स यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे दाद मागितली आहे. मात्र त्याला अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

खासगी आस्थापनांमध्ये प्राधान्याने बोर्डाचे सुरक्षा रक्षक घेण्यात यावेत, असे 1981च्या सुरक्षा रक्षक मंडळ कायद्याने बंधन घातलेले आहे. पण त्याला स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेने हरताळ फासला आहे. त्यातून अमराठी सुरक्षा रक्षकांचा भरणा करणाऱया खासगी पॅरागॉन सिक्युरिटी एजन्सीचे बँकेत वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या मुंबई, ठाणे, वाशी येथे डझनभर शाखा आहेत. त्या शाखांमध्ये सिक्युरिटी बोर्डाचे मराठी सुरक्षा रक्षक 36 तर पॅरागॉन सिक्युरिटी एजन्सीच्या सुरक्षा रक्षकांची संख्या 75 इतकी आहे. पॅरागॉन एजन्सीने राज्य सरकारच्या बोर्डाच्या मराठी सुरक्षा रक्षकांना हाकलून लावण्याचा डाव बँकेचे सुरक्षा अधिकारी भिवाश घोष यांच्याशी संगनमत करून रचला आहे, असा आरोप मराठी सुरक्षा रक्षक करू लागले आहेत.

आठवडय़ातून तीनदा शिफ्टमध्ये बदल!
सुरक्षा रक्षकांना फक्त आठवडय़ाची रजा मिळते. त्यांना नैमित्तिक रजा, आजारपणाची रजा आणि विशेष अधिकाराची रजा लागू नाही. त्यामुळे काwटुंबिक अडचणी, घरगुती कामासाठी त्या सुरक्षा रक्षकांना आपापसात डय़ुटी बदलून घेण्याचा एकमेव मार्ग उपलब्ध आहे. मात्र त्यांचा तोही मार्ग सुरक्षा अधिकारी घोष यांनी बंद करून टाकला आहे. त्यासाठी आठवडय़ाने बदलणारी त्यांची शिफ्ट आता आठवडय़ात तीनदा बदलली जाऊ लागली आहे. त्यामुळे सारे सुरक्षा रक्षक त्रासले आहेत. कोरोना काळात स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेचे अधिकारी – कर्मचारी हे घरी सुरक्षित बसून वर्क फ्रॉम होम करत असताना आम्ही जिवाला धोका पत्करून डय़ुटी केली. पण बँकेचे व्यवस्थापन आता आम्हा मराठी सुरक्षा रक्षकांची रोजीरोटी हिसकावण्यास टपले आहेत, असे सुरक्षा रक्षकांचे म्हणणे आहे.