लैंगिक छळाची तक्रार,लेस्बियन महिलेला अटकपूर्व जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन, मुंबई

लैंगिक छळाचा आरोप असलेल्या लेस्बियन महिलेला मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. २०१७ साली या विवाहीत महिलेविरोधात तिच्या प्रेयसीने लैंगिक छळाची तक्रार नोंदवली होती. सत्र न्यायालयाने या विवाहीत महिलेला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता, मात्र हा आदेश फिरवत उच्च न्यायालयाने या विवाहीत महिलेला दिलासा दिला आहे.

विवाहीत महिला आणि तिची प्रेयसी या दोघी एकमेकींना १९९७ सालापासून ओळखत होत्या. बऱ्याचवेळा भेटल्यानंतर या दोघींना जाणीव झाली की आपण समलिंगी आहोत आणि एकमेकींबद्दल आकर्षण वाटतंय. दोन मुलांची आई असलेल्या महिलेने आपला लैंगिक छळ केला आणि वारंवार ब्लॅकमेल करत दीड लाखांचे दागिने उकळल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

उच्च न्यायालयाने विवाहीत महिलेला अटकपूर्व जामीन देताना म्हटलं की दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की या दोन महिलांमध्ये समलिंगी संबंध होते. हे संबंध वैध का अवैध हे आमच्यासमोर असलेल्या याचिकेमध्ये ठरवलं जाऊ शकत नाही. विवाहीत महिलेचा तिच्या प्रेयसीत असलेला रस संपल्याने तिने नवऱ्याला सोडून देण्याचं वचन पूर्ण केलं नाही.  यामुळे भडकलेल्या प्रेयसीने तिच्याविरोधात ही तक्रार केली होती असं न्यायालयाच्या निदर्शनास आलं आहे. प्रेयसीने केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याने विवाहीत महिलेची कोठडी मिळवून चौकशी करण्यास काही अर्थ नसल्याचं म्हणत उच्च न्यायालयाने विवाहीत महिलेला १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.