लग्नाचे आमीष दाखवून विवाहितेचा खून, चपलांमुळे सापडला खुनी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, लातूर

एका विवाहितेला लग्नाचे आमीष दाखवून तिचा खून झाल्याची घटना लातूर जिल्ह्यात घडली. अविवाहित तरुणाने घराशेजारी राहणाऱ्या विवाहितेला लग्न करण्याची बतावणी करून तिच्याशी आधी प्रेम आणि नंतर शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातच गाव सोडून बाहेर एकत्र राहण्याचे नाटकही केले. मात्र, त्यांच्या संबंधात दुरावा निर्माण झाला आणि त्याने तिला गावाला परत आणून मित्रांच्या मदतीने तिचा खून केला. इतकेच नव्हे तर, तिने आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण करीत त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेतात पुरून परस्पर विल्हेवाट लावली. ही धक्कादायक घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांद (मानकापूर) येथे रविवारी (26 मे) रात्री उशिरा उघडकीस आली.

मृत महिलेचे नाव उर्मिला गजानन धारणे (40) तर रोशनबाबा देवके (24), सचिन नत्थू घरत (30) व सुनील अर्जुन ढोणे (27) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. हे चौघेही नांद (ता. भिवापूर) येथील रहिवासी आहेत. उर्मिला व रोशन शेजारी राहत असून त्यांचे दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. विशेष म्हणजे, रोशन अविवाहित आहे. त्यांच्या प्रेमप्रकरणाची गावभर चर्चा असल्याने दोघांच्याही घरी भांडणे व्हायची. त्यामुळे दोघेही तीन महिन्यांपूर्वी पळून गेले होते. नंतर त्यांच्यात पोलिसांसमक्ष समझोता केला़ दोघेही बाहेरगावी राहायला गेले. रोशन महिनाभरापूर्वी एकटाच गावात राहायला आला व लग्नासाठी मुली बघायला लागला. दुसरीकडे उर्मिला नागपूर येथे धुणीभांडी करू लागली. परंतु तिच्याबाबत कुणाला काहीही माहिती नव्हते. काही दिवसांपूर्वी त्याने तिला कोरा (ता. समुद्रपूर, जिल्हा वर्धा) येथे त्याच्या मावसभावाच्या घरी भेटायला बोलावले. त्यानंतर नातेवाइकांनी दोघांनाही परत नांदला आणले़ मात्र, त्याच्या कुटुंबीयांच्या विरोधामुळे दोघेही कोरा येथे परत गेले. चार दिवसांपूर्वी दोघेही नांद येथे आले आणि त्यांनी गावालगतच्या देवके यांच्या शेतातील घराच्या स्लॅबवर रात्र काढली. दुसºया दिवशी त्या घरामागील असलेल्या वडाच्या झाडाला लाल साडी परिधान केलेली महिला आढळून आल्याचे स्थानिक गुराख्याला आढळले़ त्यानंतर गावात चर्चेला उधाण आले. प्रत्यक्ष पाहणीत तिथे मृतदेह नसल्याने तसेच झाडाखाली चपला व लाल बांगड्यांचे तुकडे आढळून आल्याने संशय बळावला. मात्र, झाडाच्या फांदीला फास घेतल्याच्या कुठल्याही खुणा नव्हत्या़

रोशनचा मात्र गावात मुक्त संचार सुरू होता. तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविताच पोलिसांनी तपासाला वेग दिला. सोमवारी (27 मे) दुपारी उपविभागीय पोलीस अधिकारी (प्रभारी) राजेंद्र चव्हाण, तहसीलदार साहेबराव राठोड, ठाणेदार (प्रभारी) सुधाकर आंभारे, उपनिरीक्षक किशोर धोपाडे, राजेंद्र डहाके, नागेश वागाडे, नरेश बाटबराई, श्रीचंद पवार यांच्या उपस्थितीत मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला. शिवाय, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. याप्रकरणी भिवापूर पोलिसांनी भादंवि 302, 201, 34 अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

चपला ठरल्या महत्त्वाचा पुरावा
काही ग्रामस्थांना रोशन व उर्मिला सिर्सीहून नांद येथे येत असल्याचे बघितले होते. झाडाजवळ आढळून आलेल्या चपला नेमक्या कुणाच्या आहेत, हे तपासण्यासाठी पोलिसांनी रोशनला बोलावून विचारपूस केली. सुरुवातीला त्याने तिच्याशी दोन महिन्यांपासून संपर्क नसल्याचे सांगून उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. त्यातच तो खोटा बोलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याला कोरा येथे नेले. तिथे एका महिलेने त्या चपला उर्मिलाच्या असल्याचे सांगितल्याने रोशनची फसगत झाली.