मस्जिद बंदर स्थानकाच्या रेल्वे हद्दीतील मायक्रो टनेलिंगचे काम पूर्ण, रुळांवर पाणी साचणे झाले बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या मस्जिद बंदर स्थानकात मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने ट्रॅकखालून पाणी वाहून जाण्यासाठी मायक्रो टनेलिंगचे काम अखेर पूर्ण झाले आहे. रेल्वेची वाहतूक बाधित न करता रुळांच्या खालून पाणी वाहून जाण्यासाठी एक हजार व्यासाची आरसीसीची पाईपलाईन टाकण्याचे ‘मायक्रो टनेलिंग’ पद्धतीचे महत्त्वपूर्ण काम करण्यात रेल्वेला यश आले आहे. या कामामुळे मस्जिद बंदर आणि सॅण्डहर्स्ट रोड येथे रुळांवर पाणी साचणे बंद झाले आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबई महापालिका आयुक्तांबरोबर मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची बैठक झाली होती. समुद्राची भरती असताना येथे जर ठरावीक वेळेत जादा पर्जन्यवृष्टी झाल्यास कल्व्हर्ट तसेच पर्जन्य नाल्यांच्या अपुऱ्य़ा क्षमतेमुळे रुळांवर पाणी साचून लोकल सेवा खंडित होत होती. यावर या बैठकीत मायक्रो टनेलिंगची कामे हाती घेण्याचे ठरले. या प्रकल्पात रेल्वे आणि पालिकेच्या जागेत हे काम करण्यास 2021 च्या एप्रिलअखेर सुरुवात झाली. रेल्वे हद्दीतील मायक्रो टनेलिंगची काम नुकतेच संपले आहे. आता पालिकेच्या हद्दीतील काम या महिन्यात संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचे पाणी थेट या मायक्रो टनेलिंग कामातून थेट बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या हद्दीत पुराचे पाणी साचणार नाही.

सॅण्डहर्स्ट रोड व दादर–परळ येथील कामेही पूर्ण

सॅण्डहर्स्ट रोड स्थानक येथे 1800 मिमी व्यासाची 425 मीटर लांबीची ट्रॅकच्या खालून पश्चिमकडून पूर्व बाजूला आरपार जाणारी पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले होते. दादर आणि परळ येथेही असे काम मान्सूनमध्ये करण्यात आले आहे. सॅण्डहर्स्ट रोड येथील प्रयोग यशस्वी झाला आहे. मस्जिद बंदर स्थानकातील मायक्रो टनेलिंगचे काम कमी कालावधीत पूर्ण झाले असून या मान्सूनमध्ये मस्जिद बंदर स्थानकात पाणी साचले नाही असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल पुमार लाहोटी यांनी म्हटले आहे.