
माथेरान येथे पर्यटनासाठी येणाऱया पर्यटकांच्या वाहनांच्या पार्ंकगची मोठी समस्या आता कायमची दूर होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माथेरानमधील दस्तुरी येथील 22,333.70 चौरस मीटरचा शासकीय भूखंड वाहनतळासाठी माथेरान नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या जागेवर पार्किंग सुविधा उभारल्या जाणार आहेत.
यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करून या जमिनीच्या हस्तांतरणास मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966मधील तरतुदींनुसार ही जमीन नगरपरिषदेला पूर्णपणे विनामूल्य देण्यात आली आहे. वर्ग-2च्या शासकीय अटी-शर्तीनुसार हा भूखंड नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. माथेरान हे पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्र असल्याने तिथे वाहनांना बंदी आहे. त्यामुळे सर्व पर्यटकांना आपली वाहने दस्तुरी नाक्यावरच पार्क करावी लागतात. सुट्टय़ांच्या काळात तिथे जागेअभावी वाहनांच्या प्रचंड रांगा लागतात. आता तब्बल 22 हजार चौरस मीटरहून अधिक जागा पार्ंकगसाठी मिळाल्याने पर्यटकांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.
प्रेमासाठी वाट्टेल ते…
प्रेमासाठी लोक काय करतील याचा काही नेम नाही. न्यूयॉर्कमधील ‘एम्पायर स्टेट’ इमारतीवर एंजेला निकोलाउ आणि इव्हान कुजनेत्सोव चढले आहेत. कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय पोहोचत त्यांनी ‘जेव्हा प्रेमाची शक्ती सत्तेच्या आकर्षणावर मात करेल, तेव्हा जगात शांतता नांदेल’ असा संदेश असलेला काळा बॅनर फडकावला. इव्हानने एंजेलाला प्रपोज केले आणि तिनेही होकार दिला. काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोघांना अटक करण्यात आली. या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. trendeditz19 नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आले आहे. यूजर्सकडून ‘प्रपोज नव्हे तर हा जीवनाचा शेवट’ अशा प्रतिक्रिया व्हिडीओला मिळत आहेत.

























































