वाईट वाटतेय, पण कोणताही पर्याय नाही! वैयक्तिक कारणामुळे मेरी कॉमने सोडले शेफ दी मिशनचे अध्यक्षपद

मी वैयक्तिक कारणांमुळे ‘शेफ दी मिशन’चे अध्यक्षपद सोडतेय. याचे मला खूप वाईट वाटतेय, पण मला यावाचून दुसरा कोणताही पर्याय दिसत नसल्याचे सांगत तब्बल सहा वेळा जगज्जेती ठरलेली हिंदुस्थानची ‘बॉक्सिंग स्टार’ एम. सी. मेरी कॉमने आपला राजीनामा हिंदुस्थानी ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांच्याकडे पत्राद्वारे पाठवला आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या अभियानाचे प्रमुखपद हे मेरी कॉमकडे सोपवण्यात आले होते. 21 मार्च रोजी मेरीची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती, मात्र मेरीने वैयक्तिक करणास्तव हे पद सोडल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

‘देशाची कोणत्याही प्रकारे सेवा करण्याची संधी मिळणे ही नेहमीच अभिमानाची बाब असते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या अभियानाचे प्रमुख पद स्वीकारण्यासाठी मानसिकदृष्टय़ा मी तयार होते, मात्र वैयक्तिक कारणास्तव मी हे पद सोडत आहे, याचा मला खेद आहे. मी या जबाबदारीपासून मागे हटत असल्याचे मला अति दुखः आहे, मात्र माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱया हिंदुस्थानच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे मी नक्की काम करेन,’ असे मेरी कॉमने लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.