कोरोना प्रतिबंधक गोळीला मिळाली मान्यता; जगात ब्रिटनचा नंबर वन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगापुढील कोरोनाचे आव्हान अजून संपलेले नाही. बहुतांश देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असतानाच ब्रिटनने मोठी खूशखबर दिली आहे. ब्रिटन सरकारने जगात सर्वात आधी कोरोनाच्या उपचारादरम्यान अमेरिकेतील मर्क फार्मा कंपनीची मोल्नुपिराविर गोळी वापरण्यास सशर्त मंजुरी दिली आहे. क्लिनिकल चाचणीत ही गोळी अधिक परिणामकारक आढळली असून या गोळीमुळे कोरोना लढयाला नवे बळ मिळणार आहे.

मर्क फार्मा कंपनी ही गोळी बनवण्यासाठी इतर कंपन्यांनाही परवानगी देण्यास तयार आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच तसे जाहीर केले होते. कंपनीच्या या निर्णयामुळे कोरोनाची महागडी लस विकत घेऊ न शकणाऱया गरीब देशांना सर्वाधिक फायदा होणार आहे. जर्मनीसह अनेक देशांमध्ये मोल्नुपिराविर गोळीच्या चाचण्या करण्यात आल्या. त्या चाचण्यांमध्ये ही गोळी कोरोनावर परिणामकारक असल्याचे आढळून आले. त्याच निष्कर्षांच्या आधारे ब्रिटनने या गोळीचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र ही गोळी सर्वसामान्यांसाठी बाजारात किंवा हॉस्पिटलमध्ये कधी उपलब्ध होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबतची माहिती नंतर जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.