
टेनिसजगतातील ‘नंबर वन’ टेनिसपटू असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचे ‘कॅलेंडर स्लॅम’चे स्वप्न अखेर भंगले. याचबरोबर 21 वे ग्रॅण्डस्लॅम जिंकून रॉजर फेडरर व राफेल नदाल या प्रतिस्पर्ध्यांना पिछाडीवर टाकण्याचा त्याला विश्वविक्रमही लांबणीवर पडला. द्वितीय मानांकित रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने यूएस ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या किताबी लढतीत नोव्हाक जोकोविचचा सरळ सेटमध्ये पराभव करून कारकीर्दीतील पहिल्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदावर आपले नाव कोरले.
रविवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या या अंतिम लढतीत डॅनिल मेदवेदेवने नोव्हाक जोकोविचवर 6-4, 6-4, 6-4 असा विजय मिळवित विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ही लढत 2 तास 15 मिनिटांपर्यंत रंगली. या सामन्यात डॅनिल मेदवेदेव सुरुवातीपासूनच आघाडीवर होता, तर नोव्हाक जोकोविच दडपणाखाली दिसला. नोव्हाक जोकोविच प्रत्येक सेटमध्ये पिछाडीवर होता. सामना संपल्यानंतर थकलेला डॅनिल मेदवेदेव बराच वेळ कोर्टवरच पडून राहिला. 25 वर्षीय डॅनिल मेदवेदेव 2019 मध्ये प्रथमच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्यावेळी स्पेनच्या राफेल नदालने त्याला हरविले होते, मात्र यावेळी त्याने कोणतीही चूक न करता नोव्हाक जोकोविचसारख्या मातबर खेळाडूला धूळ चारून जेतेपद पटकावले. नोव्हाक जोकोविचने या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले होते. नोव्हाक जोकोविचने यूएस ओपन स्पर्धा जिंकली असती तर त्याचे कॅलेंडर स्लॅम पूर्ण झाले असते व त्याने आपल्या कारकीर्दीतील विक्रमी 21 वे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकावून रॉजर फेडरर व राफेल नदाल यांना मागेही टाकले असते.
सुवर्णसंधी दवडली
नोव्हाक जोकोविचला तब्बल 1969 नंतर कॅलेंडर ग्रॅण्डस्लॅम पूर्ण करण्याची मोठी संधी होती. रॉड लेव्हरने 52 वर्षांपूर्वी त्या हंगामातील सर्व चार ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकून कॅलेंडर स्लॅमचा विश्वविक्रम केला होता. स्टेफी ग्राफ 1988 मध्ये कॅलेंडर स्लॅम पूर्ण करणारी महिला खेळाडू ठरली होती. रॉड लेव्हरने 1962 मध्येदेखील कॅलेंडर स्लॅमचा पराक्रम केला होता. नोव्हाक जोकोविचने विजेतेपद मिळवले असते तर त्याचे 21 वे ग्रॅण्डस्लॅम विक्रमी ठरले असते.
अन् जोकोविच ढसाढसा रडला
सर्वाधिक 21वे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद आणि ‘कॅलेंडर स्लॅम’ हे दोन विक्रम पूर्ण होण्याचे स्वप्न भंगताच अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच्या अश्रूंचा बांध फुटला. त्याला हुंदके अनावर झाले. सामना संपल्यानंतर नोव्हाक जोकोविचने आपली रॅकेट कोर्टवर आपटून आपटून तोडली. मग बेंचवर बसून आपल्या टॉवेलमध्ये ढसाढसा रडायला लागला. सामना डॅनिल मेदवेदेवने जिंकला असला तरी उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांनी नोव्हाक जोकोविचला उभे राहून प्रचंड टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली.


























































