नदीजोड प्रकल्प लोकचळवळ होणे काळाची गरज – खासदार प्रतापराव जाधव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मेहकर

केंद्र सरकारने नमामि गंगे अभियानच्या माध्यमातून नदीजोड अभियान हाती घेतले आहे. सदरचे अभियान योग्य गतीने राबविल्या गेल्यास येत्या काळात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार नाही. वैनगंगा, नळगंगा व पैनगंगा या नद्या जोडल्या गेल्यास बुलढाणा जिल्ह्यासह अकोला, वाशिम, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांच्या सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल, म्हणून नदीजोड अभियान ही लोकचळवळ झाली पाहिजे. असे प्रतिपादन शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे.

स्थानिक महाराष्ट्र अर्बन बँकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात 26 जानेवारी रोजी बोलत होते. यावेळी शिवसेना आमदार डॉ. संजय रायमुलकर, महाराष्ट्र अर्बन बँक अध्यक्ष ऋषिकेश जाधव, नदीजोड अभियान साठी काम करणारे सुरेंद्र खपके, विकास डाळिंबकर, प्रवीण खंडेलवाल, महेंद्र गवळी, रवी पाखरे, भास्कर कदम, ज्ञानेश्वर डहाके, बँक उपाध्यक्ष राजेंद्र पळसकर, कार्यकारी संचालक अजय उमाळकर, उपसभापती बबनराव तुपे, न.प. उपाध्यक्ष जयचंद बाठिया यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नदीजोड प्रकल्पाच्या सर्व्हे साठी महाराष्ट्र अर्बन क्रेडिट सोसायटीच्या तर्फे 5 लाखा रुपयांचा धनादेश सुरेंद्र खपके व त्यांचे सहकार्‍यांना देण्यात आला. खासदार जाधव पुढे म्हणाले, की या नदीजोड अभियानामुळे ब्रह्मपुत्रा, वैनगंगा, नळगंगा ते पैनगंगा जोडल्यास, बुलढाणा जिल्ह्यासह पश्चिम विदर्भ सुजलाम सुफलाम होईल.

नदीजोड प्रकल्पाला वाहून घेतलेले सुरेंद्र खपके माहिती देताना म्हणाले, की सदरचा नदीजोड प्रकल्प म्हणजे विदर्भाची लाईफ लाईन असणार आहे. यामुळे तापी गोदावरी खोरे संपन्न होतील. शेतकर्‍यांचे उत्पादन 3 ते 4 पटीने वाढेल. यामुळे विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील. ते पुढे असेही म्हणाले, की येत्या 2024-25 या काळात पर्जन्यमान अत्यंत कमी असणार आहे. यामुळे भूतकाळा पेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जगातील वेगवेगळ्या हवामानखाते संस्थांनी वर्तविली आहे. व्ही.एन.आय.टी.च्या माध्यमातून वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर झाला असून यासाठी 53 हजार कोटी खर्च अपेक्षित असल्याचे झालेल्या सर्वेत सांगण्यात आलेले आहे. पण मात्र हे पाणी बुलढाणा जिल्ह्यापर्यंत येण्यासाठी 50 किमी पाणी लिफ्ट होणे अत्यंत आवश्यक आहे. मागच्या सर्व्हे मध्ये बुलढाणा जिल्हा नदीजोड प्रकल्पापासून वंचित आहे. त्यामुळे यासाठी पुन्हा पीपीआर होणे गरजेचे आहे. वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा जोडल्या शिवाय विदर्भाच्या सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार नाही असेही खपके म्हणाले. या कार्यक्रमास बँकेचे संचालक तुषार सावजी, रामराव म्हस्के, सुरेश काळे, दिवाकर मेहकरकर, गजानन देशमुख, व बँक व्यवस्थापक दिलीप सुर्वे यांचेसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व महाराष्ट्र अर्बनचे कर्मचारी उपस्थित होते.