जरांगेंचा शिंदेंवर 500 कोटींचा बॉम्ब! माझ्या नावावर भाजपकडून पैसे उचलले की नाही ते सांगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्ही मनोज जरांगे यांना 500 कोटी रुपये द्यायचे आहेत असे सांगून भाजपकडून पैसे उचलले. श्रीकांत शिंदे यांनी ते माझ्यापर्यंत पोहचवले अशी दिल्लीत भाजपच्या नेत्यांत कुजबुज आहे. खरं काय ते सांगा, नाहीतर मला खोलात जावं लागेल, असा इशारा देत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटींचा बॉम्ब फोडला.

बीडच्या नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे दसरा संमेलन झाले. यावेळी जरांगे यांनी मराठा आरक्षण, दुष्काळी मदत, शेतकरी कर्जमाफी आदी मुद्दय़ांवर सडेतोड भाष्य करत महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे, दोन ते अडीच वर्षांपूर्वीची घटना अलीकडेच आपल्या कानावर आल्याचे सांगत जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरू असलेल्या राजकारणावर हल्ला चढवला.

जरांगे म्हणाले, एकनाथ शिंदे तुम्ही माझ्याबद्दल भाजपच्या लोकांना खोटं सांगितलं. जरांगेंना 500 कोटी रुपये द्यायचे आहेत आणि ते 500 कोटी रुपये तुम्ही घेऊन मला दिलेत, अशी कुजबुज भाजपचे नेते करत आहेत. जरांगे आपला थर्ड पर्सन आहे असं तुम्ही भाजपला म्हणाला आहात का? तुम्ही खरोखरच मला पैसे दिले असतील तर हो म्हणा आणि नसतील दिले तर तेही शिंदेंनी जाहीरपणे उद्यापर्यंत सांगावे, असे आव्हान जरांगे यांनी दिले.

माझ्या हाकेवर 2,500 कोटी उभे राहतील

‘अरे, 500 कोटी म्हणजे किती होतात माहिती आहे का? दोन एकरचे शेततळे भरून जाईल एवढी ती रक्कम आहे. मी स्वतः 5,000 रुपये कधी एकत्र पाहिले नाहीत. माझ्या समाजाने आंदोलनात 3 ते 4 हजार कोटी रुपयांची तर केवळ फुले उधळली असतील. माझ्या एका हाकेवर समाजाने 100-100 रुपये दिले तरी 2,500 कोटी उभे राहतील, असा टोला जरांगे यांनी यावेळी लगावला.

मला संपवण्यासाठी गुप्त चर्चा

मला कसे संपवायचे यासाठी अनेक कट कारस्थाने रचण्यात आली. याबाबत एका माजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 40 मिनिटांची गुप्त चर्चा झाली. त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. वेळ आल्यावर ते जनतेसमोर ठेवीन. 40 मिनिटांची ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे. माझ्या विरोधात कारस्थान रचणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा जरांगे यांनी दिला.

दोन महिन्यांनंतर पळता भुई थोडी होईल

मी तीन महिने नेत्यांवर बोलणार नाही असा शब्द दिला होता. त्याला आता एक महिना पूर्ण झाला असून दोन महिने बाकी आहेत. मी शब्दाचा पक्का आहे म्हणून सध्या शांत आहे, नाहीतर पंस मामाला सर्वात जास्त धुतले असते. मात्र दोन महिने संपल्यानंतर मी एक पाऊल पुढे टाकून असा बाजार उठवणार की यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

मराठा कुणबी नोंदींसाठी हेल्पलाईन

मराठा आणि कुणबी समाजाच्या अडचणी तत्काळ सोडवण्यासाठी आणि आंदोलनाची रचना मजबूत करण्यासाठी 22 तारखेला तीन स्वतंत्र हेल्पलाईन नंबर सुरू करण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली. पहिला मराठा सेवक नोंदणासाठी. कुणबी दाखले व एसईबीसी अडचणी आणि मराठा बांधवांच्या सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणींसाठी असे तीन स्वतंत्र हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात येणार आहेत.

मराठय़ांना मोठं करण्याऐवजी तुम्ही घरं भरली

आम्ही मराठे कोणाच्याच जिवावर नाही, आम्ही आमच्याच जिवावर आहोत, हे आपण दाखवून दिले. तुमच्या हातात सत्ता होती. तुम्ही मराठा समाज मोठा करायला हवा होता. तुम्ही तुमची घरं भरली, तुम्ही बंगले बांधले, जमिनी घेतल्या. मराठय़ांच्या विरोधात जाणाऱ्यांना 2029 ला निवडून येऊ द्यायचे नाही, असे जरांगे म्हणाले.

मी तुमचा नोकर नाही

त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही म्हणतो तसे वागा. आम्ही आरक्षण दिले, यापुढे दिले नाही तर आमच्याविरोधात भांडू नका. माझ्याकडून असं कसं होईल? मी माझ्या समाजासाठी भांडायचं नाही का? मी माझ्या समाजासाठी मागणी करायची नाही? मग मी माझ्या समाजाशी धोका करतोय त्याचा अर्थ असा होतो. तुमचं ऐकायला मी तुमचा नोकर नाही, असे जरांगे यांनी ठणकावले.

पाच हजार रुपये मदतीवरून सरकारवर निशाणा

सरकारने पाच हजार रुपये मदत दिली आहे, पण हे पैसे बँकेतून काढण्यासाठी आठ दिवस बँकेत चक्कर मारावी लागणार आहे. रोज बँकेत जाण्यासाठी येण्या-जाण्याचा खर्च 200 रुपये होणार आहे. म्हणजे प्रवास खर्चावरच आठ दिवसांत दोन हजार रुपये खर्च होणार आहेत. म्हणजे हातात तीन हजार रुपयेच उरणार आहेत. त्यात सकाळचा नाश्ता आणि जेवणावर 200 रुपये जातील, दुपारच्या जेवणावर 200 रुपये जातील. म्हणजे जेवणावर 3200 रुपये खर्च होणार आहे. मग काय हातात घंटा राहील? असा हिशेबच मनोज जरांगे यांनी मांडला.

जरांगेंच्या सरकारकडे

प्रमुख मागण्या

  • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या.
  • शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा.
  • पीक विम्याचे सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा.
  • शेतकऱ्यांचं रखडलेलं अनुदान तातडीने द्या.
  • चारा छावण्या गावा-गावात उभ्या करा.
  • पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा.

पुढचे आंदोलन शेतकऱ्यांसाठी

मराठा आरक्षणासाठी मुंबईला जायची तयारी ठेवा, असे आवाहन करतानाच पुढचे आंदोलन शेतकऱ्यांसाठी असेल, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली. राज्यात भयानक दुष्काळ आहे. शेतकऱ्यांची पिके जळून गेली आहेत. शेतात काही उरलं नाही. त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता पुढचं आंदोलन आपल्याला शेतकऱ्यांसाठी करायचं आहे. एक लाख रुपये हेक्टरी मदत मिळवायचीच आहे, असं जरांगे म्हणाले.

जर तुम्ही मला पैसे दिले नसतील तर मग भाजप नेमका तुम्हाला संपवतोय का तुम्ही मला संपवताय, याचा छडा लागलाच पाहिजे. मी इमानदारीने काम करतोय म्हणून माझ्याच मागे लागलेत.