भाजप दलितविरोधी, मनुस्मृती आणण्याचा कट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, लखनौ

भाजप हा जातीयवादी पक्ष असून, दलितविरोधी आहे. त्यांचा देशात मनुस्मृती आणण्याचा डाव असल्याचा बॉम्बगोळा टाकत बहराईचच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. आरक्षण संपवण्याचा भाजपचा कट असल्याचाही आरोप त्यांनी केला.

बहराईच येथील भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी आज स्वपक्षाच्या विरोधात बंड पुकारले. भाजपला संपूर्ण देशात मनुस्मृती आणायची आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. देशाची घटना बदलण्याचे षड्यंत्र रचण्यात आले असून, आरक्षण संपवण्याचा मोठा कुटिल डाव भाजपने आखला आहे, असा आरोप करत त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. मोदी सरकारकडे आपण अनेक मागण्या केल्या. माझ्या मागण्या फेटाळण्यात आल्या. देश हा घटनेनुसार चालणार आहे, मनुस्मृतीने नाही, असा टोलाही त्यांनी मारला.