
शिवसेनेच्या गद्दार आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील पुढील सुनावणी उद्या विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्याकडे होणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष कार्यालयातून मिळाली. या सुनावणीवेळी पुढील प्रक्रियेचे वेळापत्रकही ठरणार आहे.
आमदारांच्या अपात्रतेबाबत राहुल नार्वेकर यांनी गेल्या 14 सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नाराजी व्यक्त करतानाच एका आठवडय़ात सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने कान टोचल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. तिथे त्यांनी कायदेतज्ञांचा सल्ला घेतला. त्यानंतर आता उद्या सुनावणी होणार आहे.
मागील सुनावणीवेळी आपल्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून याचिकेसंदर्भातील कागदपत्रे मिळावीत अशी मागणी मिंधे गटाने केली होती. त्यानुसार दोन्ही गटांना आठवडाभरात एकमेकांची कागदपत्रे परस्परांना देण्यास नार्वेकर यांनी सांगितले होते. तसेच त्या कागदपत्रांवर उत्तर सादर करण्यास दहा दिवसांचा कालावधी दिला होता.
वकील बाजू मांडणार
उद्याच्या सुनावणीमध्ये आमदार उपस्थित राहणार नसून त्या-त्या गटाच्या वकिलांकडून आमदारांची बाजू मांडली जाणार आहे. मागील सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांनी प्रत्येक आमदाराचे म्हणणे ऐकून घेतले होते.


























































