26/11: घरभर व्यापून राहिल्यात मेजर उन्नीकृष्णनच्या आठवणी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बंगळुरू

संदीपला हरणे कधीही आवडले नाही. त्याला सचिन तेंडुलकरसारखे जिंकायलाच खूप आवडायचे. सचिन हा त्याचा आवडता क्रिकेटपटू होता. हिंदुस्थान नेहमीच जिंकावा असेच त्याला वाटायचे. ‘इस्रो’ची एखादी मोहीम असफल ठरली तर तो माझे सांत्वन करायचा, अशा शब्दांत ‘इस्रो’चे माजी अधिकारी आणि संदीपचे वडील उन्नीकृष्णन यांनी पुत्र संदीपच्या आठवणी सांगितल्या.

मुंबईवर झालेल्या ‘26/11’ च्या हल्ल्याला उद्या दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात संदीप उन्नीकृष्णन यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले होते. त्यांच्या अतुलनीय बहाद्दुरीसाठी 26 जानेवारी 2009 मध्ये त्यांना ‘अशोक चक्र’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या आठवणी बंगळुरूतील दोन मजली घरात आजही जिवंत आहेत. त्यांच्या घराचा प्रत्येक कोपरा संदीपच्या आठवणींनी भरला आहे. घरात येणाऱ्या प्रत्येकाला संदीपचे वडील त्याच्या बहाद्दुरीचे किस्से सांगतात. संदीपचे विविध लेख आजही संग्रही आहेत. या लेखांमध्ये संदीपचे अस्तित्व जाणवते. त्याच्या वडिलांसाठी हे अत्यंत दुःखदायक असले तरीही ते लेख प्रत्येकासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे उन्नीकृष्णन यांनी सांगितले. आज ते बंगळुरूत वार्ताहरांशी बोलत होते.

तुम्ही येऊ नका, त्यांना मी बघतो
देशासाठी काहीतरी करायचे, पण कुठलाही स्वार्थ न ठेवता हेच त्याच्या मनात असायचे. देशासाठी बलिदान देताना त्याने हेच केले. दहशतवाद्यांशी लढताना त्याने आपल्या सहकाऱ्यांना तुम्ही येऊ नका, त्यांच्याकडे मी बघतो असा शेवटचा संदेश पाठवला होता. हे सांगताना उन्नीकृष्णन भावूक झाले होते.

धर्मादाय संस्थांना दान द्यायचा
संदीपच्या बँक खात्यात केवळ तीन ते चार हजार रुपयेच आढळले. मला वाटले त्याला महागडय़ा वस्तू खरेदी करण्याचा शौक असावा, पण तो धर्मादाय संस्थांना पैसे दान द्यायचा असे त्याच्या मित्रांनी आपल्याला सांगितल्याचे उन्नीकृष्णन यांनी सांगितले. अनेक धर्मादाय संस्थांकडून या दानधर्माबद्दल आपल्याला फोनही आल्याचे त्यांनी सांगितले.

summary- memories of late major sandeep unnikrishnan shared by his father