
जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेची फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी क्रिकेट मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. याचबरोबर हिंदुस्थानी संघाला कसोटी क्रमवारीतील ‘नंबर वन’चे सिंहासन काबीज करण्याचीही संधी या मालिकेत आहे. मात्र, ‘डब्ल्यूटीसी’ची फायनल आणि ‘नंबर वन’चे सिंहासन मिळविण्यासाठी रोहित शर्माच्या सेनेच्या मार्गात ऑस्ट्रेलियन संघाचा अडथळा आहे हे विसरता येणार नाही.
हिंदुस्थान दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध हिंदुस्थानी संघ मायदेशात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत दोनहून अधिक कसोटी सामने जिंकल्यास हिंदुस्थानी संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणार आहे. आयसीसीच्या क्रमवारीत सध्या ऑस्ट्रेलिया कसोटीत अव्वल स्थानी असून, टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. मायदेशातील या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला दोन सामन्यांत हरविल्यानंतर टीम इंडिया जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर येणार आहे.
तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘नंबर वन’ची संधी
हिंदुस्थानी संघाने सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये आपले नाणे खणखणीत वाजवून दाखविले आहे. त्यामुळेच टीम इंडिया आयसीसीच्या एकदिवसीय आणि टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाली आहे. आता कसोटीतील ऑस्ट्रेलियाचे साम्राज्य खालसा केल्यास हिंदुस्थानी संघ कसोटी क्रमवारीतही अव्वल स्थानी झेपावणार आहे.

























































