
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे शिरढोण येथे अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी 18,692 घरे आणि 342 दुकाने उभारण्याचे काम सुरू आहे. भविष्यात या प्रकल्पातील सोडतीद्वारे विक्रीसाठी उपलब्ध होणाऱ्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत सोमवारी विशेष बैठक आयोजित करण्याचे निर्देश म्हाडा उपाध्यक्षांनी दिले आहेत. शिरढोण प्रकल्पात प्रस्तावित मॉल, शाळा, दुकाने, दवाखाना, व्यायामशाळा आणि इतर नागरी सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचेही निर्देश जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले.
म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी खोणी, शिरढोण, गोठेघर व भंडार्ली येथील विविध गृहनिर्माण प्रकल्पांना भेट दिली. खोणी येथे अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी 7,174 घरे व 152 दुकाने उभारण्यात येत आहेत. त्यातील 2018 मध्ये 2,032, 2021 मध्ये 2,016 आणि 2025 मध्ये 1,012 घरांची विक्री करण्यात आली. शिरढोणला अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी 18,692 घरे आणि 342 दुकाने उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पातील अत्यल्प उत्पन्न गटातील 1,905 घरे 2018 मध्ये तर 5,227 घरे 2025 मध्ये सोडतीद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
देखभाल शुल्क कमी करा, रहिवाशांची मागणी
लाभार्थ्यांनी म्हाडातर्फे आकारण्यात येणारा देखभाल शुल्क कमी करण्याची मागणी जयस्वाल यांच्याकडे केली. याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड, उपमुख्य अभियंता संतोष बोबडे, कार्यकारी अभियंता संदीप भदाणे उपस्थित होते.


























































