
म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरील 265 पात्र अर्जदारांची गुरुवारी पहिल्यांदाच संगणकीय सोडत काढण्यात आली. या ऐतिहासिक निर्णयामुळे म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या खुराडय़ात गेली 30 ते 40 वर्षे खितपत पडलेल्या नागरिकांची अखेर सुटका झाली आहे. अनेक वर्षांनी हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे विजेत्यांना आनंदाश्रू अनावर झाले.
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारितील मास्टर लिस्टवरील 265 पात्र भाडेकरू व रहिवाशांना सदनिकांचे वितरण करण्यासाठी वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते संगणकीय सोडत काढण्यात आली. या ऐतिहासिक निर्णयामुळे मास्टर लिस्टवरील सदनिका वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान होईल, असे शंभरकर म्हणाले.
300 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या जुन्या सदनिकाधारक 18 पात्र रहिवाशांना त्यांच्या मागणीनुसार 450 चौरस फूट वाढीव क्षेत्रफळाची सदनिका देण्यात आली. 300 चौरस फुटांच्या जुन्या सदनिकाधारक 52 पात्र रहिवाशांना 300 चौरस फुटांची सदनिका विनामूल्य वितरित करण्यात आली. 300 चौरस फुटांपेक्षा कमी आकारमानाच्या 172 जुन्या पात्र रहिवाशांना 301 ते 400 चौरस फुटांची तर 301 ते 400 चौरस फुटांच्या सदनिका असलेल्या 10 रहिवाशांना 401 ते 500 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका देण्यात आली.
401 ते 500 चौरस फुटांच्या पात्र जुन्या सदनिकाधारकांना 500 ते 600 चौरस फुटांची तर 501 ते 600 चौरस फुटांच्या 5 जुन्या पात्र रहिवाशांना 601 ते 700 चौरस फुटांची सदनिका वितरित करण्यात आली. 601 ते 753 चौरस फूट क्षेत्रफळापेक्षा अधिक आकारमानाच्या जुन्या सदनिका असलेल्या 7 रहिवाशांना 753 चौरस फुटांची सदनिका वितरित करण्यात आली.
हक्काच्या घराची आशा सोडली होती
माझे आधीचे घर माझगाव डॉकयार्ड येथे होते. 1978 साली बिल्डिंग पडल्यानंतर गेल्या 40 वर्षांपासून मी प्रतीक्षा नगरमधील संक्रमण शिबिरात राहतोय. एवढी वर्षे संक्रमण शिबिरात घालवल्यामुळे आणि वारंवार म्हाडा कार्यालयाच्या चकरा मारल्यामुळे माझ्या हयातीत हक्काचं घर मिळेल, अशी मी आशाच सोडली होती. परंतु आज मास्टर लिस्टमध्ये मला दादरसारख्या मध्यवर्ती भागात 445 चौरस फुटांचे प्रशस्त घर मिळाल्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, अशी प्रतिक्रिया लॉटरीतील विजेते दीपक शहासने यांनी दिली.
मूळ 300 चौरस फुटांची सदनिका विनामूल्य असून अतिरिक्त क्षेत्रफळाकरिता चालू आर्थिक वर्षाच्या रेडिरेकनर दराच्या 125 टक्के दराने अधिमूल्याची आकारणी करण्यात येणार आहे.
लालबागचा राजा पावला
कुंभारवाडय़ात दहा बाय दहाच्या खोलीत आमचं आयुष्य गेलं. पावसाळय़ात बिल्डिंग कोसळल्यामुळे म्हाडाने आम्हाला बोरिवलीत संक्रमण शिबिरात घर दिलं. 20 वर्षे संक्रमण शिबिरात काढल्यानंतर अखेर आज तो क्षण आला… लालबागच्या राजावर आमची मनापासून श्रद्धा आहे. त्याच्या आशीर्वादाने आम्हाला लालबागमध्येच 300 चौरस फुटांचं हक्काचं घर मिळालं, असं सांगतानाच म्हाडाच्या मास्टर लिस्टमधील विजेत्या पूजा परशुराम शिरकर यांना आनंदाश्रू अनावर झाले.






























































