नगर शहरात आणखी दहा ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन आणखी प्रसार होऊ नये म्हणून महापालिकेने पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नगर शहरात 10 ठिकाणी ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ केले आहेत.

नगर शहरासह जिह्यात कोरोना रुग्णवाढीचा सिलसिला सुरूच आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी उपाययोजनांचा एक भाग म्हणून जास्त रुग्ण असलेला परिसर सील करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी ‘कंटेन्मेंट झोन’ निश्चित करताना त्याची व्याप्ती कमी केली आहे. तसेच पूर्वी असलेला ‘बफर झोन’ रद्द करण्यात आला आहे. ठरावीक घरातील लोकांनाच ये-जा करण्यास बंधने असल्याने त्याचे नियमन करणेही सोपे जात आहे.

नगर शहरात आतापर्यंत बोल्हेगाव परिसरात तीन ठिकाणी, तसेच आर्यन सोसायटी (बालिकाश्रम रस्ता), सिव्हिल हडको, कोहिनूर मंगल कार्यालयासमोरी जयश्री कॉलनी, माणिकनगर, नीलायम सोसायटी, सारसनगर-चिपाड मळा आणि केडगाव अशा 10 ठिकाणी ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ केले आहेत. आर्यन सोसायटीमध्ये पाच विंग्ज आहेत. त्यातील ‘बी’ आणि ‘सी’ या दोन विंग सील करण्यात आल्या आहेत. इतर ठिकाणी ये-जा करण्यासाठी बंधने नाहीत. तसेच ज्या घरामध्ये रुग्ण आढळलेले आहेत, त्या घराच्या आसपास असलेल्या चार-पाच घरांचा समावेश ‘कंटेन्मेंट झोन’मध्ये करण्यात येत आहे. संबंधित ठिकाणी बॅरिकेड़्स, बांबू लावून त्यांच्याकडे जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच तेथे महापालिका कर्मचारी आणि पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिह्यात रुग्ण वाढत असले, तरी सर्वाधिक रुग्ण नगर शहरात वाढत आहेत. त्यामुळे जिल्हा आणि महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. रुग्ण वाढल्याने संबंधित परिसर सील करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

केअर सेंटरसाठी अजूनही तयारीच

n नगर शहरात रुग्ण वाढू लागल्यानंतर महापालिकेमार्फत कोरोना केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याची मागणी वाढू लागली आहे. आठ दिवसांपूर्वी महापालिकेच्या अधिकाऱयांनी नटराज आणि जैन पितळे होस्टेल या ठिकाणी पाहणीही केली होती. मात्र, अद्यापि ते सेंटर सुरू झाले नसल्याचे सांगण्यात येते. याबाबत चौकशी केली असता, कर्मचाऱयांची नियुक्ती केली असून, कोणत्याही क्षणी सेंटर्स सुरू होतील, असे सांगण्यात येते. तयारी करण्यात आल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्ष सेंटर्स सुरू होण्यास मात्र अद्यापि मुहूर्त मिळलेला नाही.