जम्मू-कश्मीर: पुलवामा येथे यूपीच्या मजुराची गोळ्या झाडून हत्या

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे आज उत्तर प्रदेशातील एका स्थलांतरित कामगाराची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.

‘दहशतवाद्यांनी पुलवामाच्या नोपोरा भागात यू.पी.च्या मुकेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका मजुरावर गोळीबार केला, ज्याचा नंतर मृत्यू झाला. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे’, असे कश्मीर झोन पोलिसांनी ट्विटरवर सांगितले.

पुलवामा येथे गेल्या 24 तासांतील हा दुसरा दहशतवादी हल्ला होता. रविवारी ईदगाह परिसरात क्रिकेट खेळत असताना निरीक्षक मसरूर अहमद वानी यांच्यावर तीन वेळा गोळ्या झाडण्यात आल्या.

या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी पुलवामा आणि जम्मू-कश्मीरच्या इतर भागात वाहने आणि पादचाऱ्यांची तपासणी अधिक तीव्र केली आहे. श्रीनगरमधील सर्व प्रमुख चौकांवर तसेच शहराच्या बाहेर पडण्याच्या ठिकाणी मोबाइल वाहन तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत.