मिरज रुग्णालय कोरोना संसर्ग प्रकरणी निष्काळजीपणाबाबत वस्तूदर्शक अहवाल सादर करा- अमित देशमुख

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 82 शिकाऊ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटनेची वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. या निष्काळजीपणाबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना दिल्या आहेत.

वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर, डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल तसेच अन्य कर्मचारी वैद्यकीय सेवा पुरवितात. या मंडळींनाच लागण झाली, तर वैद्यकीय सेवा कशी पुरविणार? असा प्रश्न वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी उपस्थित केला आहे. कोरोनाची मोठय़ा प्रमाणात लागण होण्यासाठी कोणत्या बाबी कारणीभूत आहेत, याबाबत त्यांनी विचारणा केली आहे. वैद्यकीय सेवा देताना घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कार्यरत असणारे मनुष्यबळ बाधित होणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. याबाबतचा अहवाल प्राप्त होताच, या प्रकाराला जबाबदार असणाऱयांवर कठोर कारवाईचे संकेत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ही घटना लक्षात घेता राज्यातील अन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनीही याबाबतचे नियम काटेकोरपणे पाळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले मनुष्यबळ बाधित होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत सर्व महाविद्यालयांना सतर्क करण्यात यावे, याबाबतच्या सूचनाही त्यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिल्या आहेत.