
गेले दहा महिने बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वेगाड्या येत्या मार्चपासून सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची तयारी सुरू आहे. मिरजेतून जाणाऱ्या व येणाऱ्या दैनिक व साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू झाल्या असून, पॅसेंजर रेल्वेही सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 मार्चपासून मिरजेतून धावणाऱ्या सुमारे 65 पॅसेंजर व एक्स्प्रेस रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने पुन्हा एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या आहेत. या विशेष एक्स्प्रेसमुळे प्रवाशांची सोय झाली आहे. मात्र, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून गेले दहा महिने मिरजेतून जाणाऱ्या कोल्हापूर, बेळगाव, सातारा, पुणे, पंढरपूर, कुर्डूवाडी पॅसेंजर अद्यापी बंद असल्याने दररोज ये-जा करणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अनलॉक काळात कोयना, महालक्ष्मी महाराष्ट्र, हुबळी-कुर्ला, राणी चेन्नम्मा, तिरुपती, यशवंतपूर-निजामुद्दीन, वास्को-निजामुद्दीन यासह इतर एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. कोल्हापूर-निजामुद्दीन व कोल्हापूर-अहमदाबाद या साप्ताहिक एक्स्प्रेसही सुरू होणार आहेत. मात्र, मिरज-पंढरपूर मार्गावरील रेल्वेगाड्यांसह पॅसेंजर रेल्वे सुरू होण्याची प्रवाशांना प्रतीक्षा आहे.
मार्चपासून पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची प्रशासनाची तयारी सुरू आहे. लॉकडाऊन काळात रेल्वेगाड्या बंद असल्याने सांगली, मिरजेसह विविध स्थानकांत थांबून असलेल्या रेल्वेगाड्या रवाना झाल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने परवानगी दिल्यास पुढील महिन्यात पॅसेंजर रेल्वे सुरू होण्याची शक्यता असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गरज असलेल्यांनाच प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार
रेल्वेस्थानकात प्रवाशांच्या नातेवाईकांनी गर्दी करू नये, यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट गेल्या मार्चपासून दहा रुपयांवरून 50 रुपये करण्यात आले आहे. सर्व प्रमुख रेल्वेस्थानकांसाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचे पाचपट दर यापुढेही कायम राहणार आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्लॅटफॉर्म तिकिटाशिवाय रेल्वेस्थानकात येणाऱ्यांवर कारवाई करण्यांत येणार असून, नातेवाईकांसोबत गरज असलेल्यांनाच प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार आहे.































































