
पुणे शहरातील ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कारागृहात असलेल्या सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि आमदाराने पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या हाताचा चावा घेतल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील दहा ते बारा दिवसांपूर्वी येरवडा कारागृहात ही घटना घडली असून, याप्रकरणी खळबळ उडाली आहे. बांधकाम व्यावसायिकावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील सहकारी बँकेच्या आर्थिक घोटळ्याप्रकरणी हे आमदार येरवडा कारागृहात जेरबंद आहेत, तर ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकही कारागृहात आहेत. मागील आठवड्यापूर्वी दोघांनाही कारागृह प्रशासनाने सेलमध्ये फिरण्यास मुभा दिली होती. त्यावेळी बँक घोटाळ्यातील आमदाराने बांधकाम व्यावसायिकाच्या हाताचा करकचून चावा घेतला. त्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली. बांधकाम व्यावसायिकाचा चावा घेतल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कारागृहातील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याप्रकरणी कारागृह प्रशासनासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
…म्हणून घेतला करकचून चावा
कारागृहात असतानाही बांधकाम व्यावसायिक बिनधास्त फिरताना दिसतात. त्यांच्यावर काहीही परिणाम होत नसल्याचा राग आमदाराला आला. त्यानंतर त्यांनी थेट व्यावसायिकाच्या हाताचा चावा घेतला. त्यामुळे कैदी आणि प्रशासनाची एकच धावपळ उडाली. ‘बडे हस्ती’ असणारे हे दोन्ही कैदी सर्वपरिचित आहेत. यापूर्वीही बांधकाम व्यावसायिकाने संबंधित आमदार आपल्याला चावत असल्याची तक्रार थेट मंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर आता आमदाराने चावा घेतल्यामुळे व्यावसायिकाला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यामुळे प्रकरण गंभीर झाले आहे.
































































